अमित शहा, अशोकराव, मुंढे की आव्हाड साऱ्याच नेत्यांची पसंती खासगी रुग्णालय

नेते सरकारी रुग्णालयात जाऊ लागले तर तेथील त्रुटी त्यांच्या लक्षात येऊन तेथीलव्यवस्था सुधारेल, असे नेत्यांना वाटत नाही का?
Ashok chavan-amith shah
Ashok chavan-amith shah

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून, अनेक राजकीय नेतेही कोरोना पॉझिटिव्ह सापडू लागले आहेत. मात्र, बहुतांश नेते हे कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रई अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते खासगी रुग्णालयांनाच पसंती देताना दिसत आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुडगावमधील हे खासगी रुग्णालय आहे. यावरुन विरोधकांनी शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेस नेते शशि थरुर यांनी या मुद्द्यावरुन शहा यांना लक्ष्य केले. शहा यांनी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारासाठी जाण्याऐवजी शेजारील हरियाना राज्यातील खासगी रुग्णालयाची निवड केली, अशी टीका थरुर यांनी केली होती. 

सोशल मीडियावरही शहा टीकेचे धनी झाले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणारे शहा एकटेच नाहीत. केंद्र आणि राज्यांमधील सुमारे 20 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील तब्बल 17 जणांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयांना पसंती दिली आहे. यात अमित शहा यांच्यासोबत आम आदमी पक्षाचे (आप) नेते व दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचाही समावेश आहे.

नेत्यांचा जर शासकीय रुग्णालयांवर विश्वास नसेल तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न विचारला गेला. याउलट शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन तेथील व्यवस्था चांगली करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत. नेतेमंडळी जर सरकारी रुग्णालयात जाऊ लागली तर तेथे काम करणाऱ्यांमध्येही विश्वास निर्णाण होईल, अशी नेटकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली.  

खासगी रुग्णालयात उपचार घेण्यात इतर पक्षांचे नेतेही आघाडीवर आहेत. अशोक चव्हाण हे बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले होते. जितेंद्र आव्हाड हे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते. धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे देखील खासगी रुग्णालायतच उपचार घेत होते. तेथे त्यांचे निधन झाले. याशिवाय राज्यातील अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातील एकानेही सरकारी रुग्णालयात जाणे पसंत केले नाही. यावर चव्हाण यांना तेव्हा पत्रकारांनी विचारणा केली होती. त्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असे प्रत्युत्तर दिले होते.  

पंजाबमधील काँग्रेस नेते व ग्रामविकास मंत्री तृप्तसिंग बाजवा हे चंडीगडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते. 
यात काही सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नेत्यांचे अपवादही आहेत. उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमलराणी वर्मा यांना संजय गांधी पोस्ट गॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज यांना ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com