महानायक अमिताभ बच्चन यांचा अमरसिंहांवरील राग अखेरपर्यंत गेला नाही? - is amitabh bacchan angry till last day of Amarsingh is the question | Politics Marathi News - Sarkarnama

महानायक अमिताभ बच्चन यांचा अमरसिंहांवरील राग अखेरपर्यंत गेला नाही?

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अमरसिंह यांना अमिताभ बच्चन यांना मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत केली होती. 

नवी दिल्ली : देशातील राजकारणात एकेकाळी केंद्रस्थानी असलेले समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंह यांचे आज दीर्घआजाराने निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

अमरसिंह यांच्याशी ज्येष्ठ अमिताभ बच्चन यांचे घनिष्ठ संबंध होते. अमिताभ जेव्हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते तेव्हा सर्वाधिक मदत अमरसिंह यांनी केली होती. त्यांची एबीसीएल कंपनी दिवाळखोरीत गेली तेव्हा कोणीही अमिताभ यांना मदत करण्यास तयार नव्हते. अमरसिंह यांनी सारी मदत मिळवून दिली. जया बच्चन यांना समाजवादी काॅंग्रेसची राज्यसभेतील खासदारकी पण अमरसिंह यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले. बच्चन यांच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात ते उपस्थित असायचे. पण या दोघांमध्ये मतभेद होण्यास सुरवात झाली.

त्याला कारणही समाजवादी पक्षातील घडामोडींचे झाले. मुलायमसिंह यांचे उजवे हात बनलेले अमरसिंह हे अखिलेश यादव यांच्या उदयानंतर मागे जाऊ लागले. तेथूनच त्यांची नाराजी वाढली. त्यांनी मुलायम यांच्याविरोधात बंड केले. या बंडाच्या वेळी बच्चन यांनी साथ दिली नसल्याने अमरसिंह नाराज झाले. त्यातूनच एकमेकांवर जाहीर टीकाटिप्पणी झाली. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या विवाहांवरूनही अमरसिंह यांनी कटू टिप्पणी केली होती. त्यानंतर दोघांत संबंध बिघडले ते बिघडलेच. अमरसिंह यांनी आपण सर्वांना माफ केल्याचे अखेरच्या दिवसांत सांगत होते. तरी त्यावर अमिताभ यांनी तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नव्हती. 

बच्चन हे सध्या कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. तेथूनही ते ट्विटरवर विविध प्रतिक्रिया देत असतात. अमरसिंह यांचे निधन होऊन चार तास झाले तरी त्यांनी ट्विट केलेले नव्हते. अमरसिंह यांच्या निधनानंतरही अमिताभ यांनी आपल्या डोक्याचा फोटो ट्विट केला. त्याचे कारण कळू शकले नाही. त्याबद्दल विचारणा त्यांच्या अनेक चाहत्यांनी अमरसिंह यांच्याबद्दल लिहावे, अशी विनंती केली होती. मात्र शनिवारी रात्री आठपर्यंत तरी अमिताभ यांनी अमरसिंह यांना श्रद्धांजली वाहिली नाही.  

 

मूत्रपिंड विकाराने ग्रस्त

अमरसिंह यांना 2013 पासून मूत्रपिंड विकाराने ग्रासले होते. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सिंगापूरला हलविण्यात आले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अतिदक्षता विभागाच दाखल होते. आज त्यांचे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आज रुग्णालयात उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी देशातील राजकारणात प्रत्येक पक्षात अमरसिंह हे परिचित नाव होते. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांचे ते निकटवर्ती होते. त्यांची बरीच कारकिर्द मुलायमसिंह यांच्यासोबतच गेली. अखेर मुलायम यांच्याशी संबंध बिघडल्याने त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता. समाजवादी पक्षात परत जाणार नाही, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती.

अमरसिंह यांनी आज सकाळीच लोकमान्य  टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्विट केले होते. याचबरोबर त्यांनी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना बकरी ईदच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बऱ्याच काळापासून आजारी असूनही ते सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांनी 22 मार्चला ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. कोरोनाविषाणूच्या संकटाशी लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी मदत करावी, असा संदेश त्यांनी व्हिडीओत दिला आहे. याचबरोबर अमरसिंह यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. त्यांनी त्यावेळी मार्च महिन्यात आणखी एक व्हिडीओ पोस्ट करुन टायगर जिंदा है, असे म्हटले होते.  

अमरसिंह यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ज्येष्ठ नेते आणि खासदार अमरसिंह यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. सार्वजनिक जीवनात आम्ही दोघे मित्र होतो. त्यांचा स्वभाव विनोदी होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख