आदित्यबाळा, तू अजून कोषात आहेस...

आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार अमित साटम यांनी खिल्ली उडवली आहे. आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस, असा टोला लगावला आहे.
1Amit_Satam.jpg
1Amit_Satam.jpg

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांवर डिझास्टर टूरीझम अशी टीका करणाऱ्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार अमित साटम यांनी खिल्ली उडवली आहे. आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस, असा टोला लगावला आहे. 

दरम्यान कोरोनाच्या फैलावासंदर्भात राजकीय नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टोलेबाजी सुरूच ठेवली असून सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी आदित्य ठाकरे यांची अवस्था झाल्याची टीका विधानपरिषदेतील  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. धारावीच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही संघावर टीका केली आहे. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे फक्त घरात बसून बेफाम विधाने करीत  आहेत.  अशा परिस्थितीत प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे धाडस दाखवा. वरळी कोळीवाडा हॉटस्पॉट असताना तुम्ही तेथे तळ ठोकून होतात, असा एकतरी फोटो दाखवा. तुम्ही अजून कोषात आहात, तेव्हा निदान तोंड तरी बंद ठेवा, अशी टीका साटम यांनी केली आहे. तर प्रवीण दरेकरही यांनीही ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. 

जनतेमध्ये जाऊन त्यांचे सुख-दु:ख समजून त्याचे नियोजन करणे, उपाययोजना करणे हे सरकारचे, मंत्र्यांचे कर्तव्य आहे. ते करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उंटावरून शेळ्या हाकण्याचा सरकारचा कारभार सुरु आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी जाऊन जर रुग्णांची, जनतेची दुःख समजून घेत असतील आणि तेथे सुव्यवस्था आणण्यासाठी मदत करत असतील तर त्यावर टिका करणे, हे सरकारला पोटशूळ उठल्याचे लक्षण आहे. त्या उद्वीग्नतेतून पर्यटनमंत्री अशी विधाने करीत आहेत, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमुळे धारावीतील कोरोना कमी झाल्याच्या भाजप नेत्यांच्या विधानांवर रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. कोरोना वाढला तर तो ठाकरे सरकारमुळे आणि कमी झाला तर आरएसएस मुळे, असं कसं चालेल. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आरएसएसचं तेवढंच योगदान आहे, जेवढं त्यांचे योगदान स्वातंत्र्यलढ्यात होतं. आरएसएस ने चीनविरुद्धही लढा पुकारावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युवा सेनेचे प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची 'नया है वह!' अशा शब्दांत खिल्ली उडविली होती. फडणवीस हे मुंबईत रविवारी (ता. 12 जुलै) पत्रकारांशी बोलत होते. "तुम्ही राज्यात फिरून कोरोनाची वस्तुस्थिती जाणून घेऊन ती जनतेसमोर मांडता. पण, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तुमच्या या दौऱ्याला 'डिजास्टर टुरिझम'  असे संबोधतात,' असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. पत्रकारांच्या त्या प्रश्‍नाला फडणवीस यांनी हसून उत्तर दिले. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात, त्यांना मंत्री बनवता येतं. पण, मंत्री बनविल्यानंतर शहाणपण येतंच असं नाही ना? त्यामुळे ठीक आहे. ते नवीन आहेत, बोलताहेत. मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काय प्रतिक्रिया देऊ नये. 

Edited  by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com