युतीचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला; पण फडणवीसांनी टाळला  - The alliance was mentioned by the Chief Minister; But Devendra Fadnavis avoided | Politics Marathi News - Sarkarnama

युतीचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला; पण फडणवीसांनी टाळला 

विजय दुधाळे : सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

शिवसेना आणि भाजपच्या युतीवर चंद्रकांता गोयल यांचे मोठे ऋण आहेत.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत युतीबाबत त्यांचे ऋण व्यक्त केले. ठाकरे यांनी युतीचा उल्लेख असला तरी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीबाबतचा उल्लेख टाळत गोयल यांच्या इतर गुणांचा उल्लेख केला. 

कोरोना संकटाच्या सावटात दोन दिवसांचे अधिवेशन आजपासून (ता. 7 सप्टेंबर) सुरू झाले. पहिल्याच दिवशी माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी आणि सभागृहाचे सदस्य राहिलेल्या मृत व्यक्तींना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी युती होण्यासाठी प्रयत्न केलेल्या गोयल यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 

ठाकरे म्हणाले की "शिवसेना आणि भाजपच्या युतीवर चंद्रकांता गोयल यांचे मोठे ऋण आहेत. युतीच्या संदर्भातील सुरुवातीच्या काळातील ज्या काही चर्चा झाल्या, त्यात अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी असायचे. त्यातील बहुतांशी चर्चा, बैठका चंद्रकांता गोयल यांच्या घरी झाल्या आहेत. त्या वेळी आपल्या युतीची (त्या वेळच्या) मुहूर्तमेढ रोवण्यात, ती घडवून आणण्यामध्ये गोयल कुटुंबीयांचे मोठे योगदान होते. विचाराशी निष्ठावान असणाऱ्या त्या नेत्या होत्या.' 

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांता गोयल यांचे युती घडविण्यातील योगदानाचा उल्लेख करत ऋण व्यक्त केले. मात्र, भाजप नेते फडणवीस यांनी मात्र त्यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करत युतीबाबत भाष्य करण्याचे टाळले. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या घडमोडीची त्याला पार्श्‍वभूमी आहे. ती कटूता फडणवीस बहुधा अजून विसलेले नसावेत, म्हणूनच त्यांनी विधानसभेत बोलताना युतीच्या संदर्भात बोलणे टाळलेले दिसत आहे. 

शोकप्रस्तावर बोलताना फडणवीस म्हणाले की पेशावरमध्ये जन्मलेल्या चंद्रकांता गोयल या भाजपच्या जुन्या, जाणत्या नेत्या होत्या. जनसंघापासून गोयल कुटुंबीय हे भाजपशी जोडलेले आहे. मुंबई महापालिकेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. विविध राज्यातील लोक राहणाऱ्या माटुंगा (मुंबई) विधानसभा मतदारसंघातून त्या 1990, 1995, 1999 अशा तीन वेळा निवडून आल्या होत्या. मुंबईतील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. 

गोपीनाथ मुंडेंसाठी रोज चॉकलेट आणायच्या 

"चंद्रकांताताईंना सभागृहाच्या मम्मी म्हणून ओळखले जायचे. सभागृहातील अनेक सदस्यांसाठी त्या खाऊ आणायच्या. भाजपचे नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे विधानसभेत येताच "मम्मी मेरे लिए चॉकलेट लाये क्‍या?' असा प्रश्‍न चंद्रकांताताईंना दररोज विचारायचे. विशेष म्हणजे त्याही दरररोज मुंडेंना चॉकलेट द्यायच्या,' अशी आठवण फडणवीस यांनी या वेळी सांगितली. 

मोबाईल म्हणून टिव्हीचा रिमोट आणला 

फडणवीस यांनी चंद्रकांता गोयल यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की "चंद्रकांताताई यांचा स्वभाव अत्यंत भोळा होता. एक दिवस त्या सभागृहात आल्या. त्या वेळी आम्ही कार्यालयात बसलो होतो. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल काढला आणि दोन-तीन बटणं दाबली. पण, आवाज येत नसल्याने त्यांनी तो मोबाईल शेजारी बसलेल्या शोभाताई फडणवीस यांच्याकडे दिला. त्या वेळी शोभाताई म्हणाल्या की चंद्रकांताताई हा मोबाईल नसून दूरचित्रवाणीचा रिमोट आहे. त्या मोबाईलऐवजी रिमोट घेऊन सभागृहात आल्या होत्या.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख