देशात घडणार इतिहास; पी. विजयन यांनी 'रॅाकस्टार' आरोग्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना दिला डच्चू - All sitting Ministers have been dropped new faces in kerala new government | Politics Marathi News - Sarkarnama

देशात घडणार इतिहास; पी. विजयन यांनी 'रॅाकस्टार' आरोग्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना दिला डच्चू

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर कोणत्याही पक्षाकडून मागील मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाते.

नवी दिल्ली : राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर कोणत्याही पक्षाकडून मागील मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाते. काहींचा खातेबदल केला जातो तर काहींना बढती मिळते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर निवडणूक न लढवलेल्या जुन्या सहकाऱ्याला कॅबिनेट मंत्री केलं. देशातील सर्वच पक्षांकडून बड्या नेत्यांची मर्जी सांभाळली जाते. पण, केरळ राज्य त्याला अपवाद ठरलं आहे. (All sitting Ministers have been dropped new faces in Kerala new government)

केरळमध्ये डाव्यांनी काँग्रेस आघाडीचा पराभव करत पुन्हा सत्ता मिळवली आहे. केरळच्या इतिहासात मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच एका पक्षाची दुसऱ्यांदा सत्ता आहे. डाव्यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेसला धुळ चारली. मुख्यमंत्री पी. विजयन (P. Vijayan) यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी राज्यात 99 जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर आज सोळा दिवसांनी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीच्या बैठकीत विजयन यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे तेच केरळचे मुख्यमंत्री असतील. पण समितीने सर्व जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला आहे. मंत्रीमंडळामध्ये आता सर्व नवे चेहरे असतील, अशी घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. 

हेही वाचा : परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात; याचिकेवरील सुनावणीतून न्यायमूर्ती गवईंनी अंग काढले

पक्षाकडून प्रसिध्द कऱण्यात आलेल्या निवेदनामध्ये काही नवीन चेहऱ्यांची नावेही देण्यात आली आहेत. त्यामध्ये एम. व्ही. गोविंदन, के. राधाकृष्णन, के. एन. बालगोपाल, पी. राजीव, बी. एन. वसावन, साजी चेरियन, वी. शिवनकुट्टी, मोहम्मद रियास, डॅा. आर. बिंदू, वीना जॅार्ज, व्ही, अब्दुल रहमान यांचा समावेश आहे. पक्षाने एम. बी. राजेश यांना विधानसभेचे अध्यक्ष केले आहे. तर के. के. शैलजा यांना पक्षाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

'रॅाकस्टार' आरोग्यमंत्री के. शैलजाही बाहेर

मागील वर्षी देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी परतल्यानंतर त्याची चाचणी पॅाझिटिव्ह आली होती. पण त्यानंतरही राज्यातील कोरोनाची पहिली लाट रोखण्यात केरळ सरकारला मोठं यश मिळालं. यामध्ये महत्वाचा वाटा होता तो, आरोग्यमंत्री के. शैलजा (K. Shailaja) यांचा. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाने केरळला पहिल्या लाटेपासून दूर ठेवले. त्याचीच परतफेड करत केरळमधील मतदारांनी त्यांना विक्रमी मतांनी विजयी केले आहे. 

शैलजा टीचर यांनी माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाकडून मत्तान्नुर मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात रिव्हॅाल्युशनरी सोशालिस्ट पक्षाचे इलीकल अगस्थी हे उमेदवार होते. अन्य तीन उमेदवारही रिंगणात होते. पण शैलजा यांना तब्बल 96 हजारांहून अधिक मतं मिळाली. त्यांच्या जवळपासही कोणताही उमेदवार नाही. अगस्थी यांना केवळ 35 हजार मतं मिळाली असून शैलजा या 60 हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी 61 टक्क्यांहून अधिक आहे. मागील निवडणुकीत केरळमध्ये सर्वाधिक मताधिक्य 45 हजारांच्या जवळपास होते. तर 2006 मध्ये हे मताधिक्य 47 हजार एवढे होते. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत शैलजा यांनी मताधिक्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनाही केवळ 40 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. 

शैलजा टीचर यांची कामगिरी

के. शैलजा यांच वय 64 असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यांनी 25 वर्षांपुर्वी राजकारणात प्रवेश केला. केरळच्या आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक जागतिक पातळीवर झाले आहे. 2018 मध्ये केरळमध्ये निपाह विषाणुची साथ आली. त्यानंतर मागील वर्षी कोरोना संकट आले. या दोन्ही संकटांनी केरळच्या आरोग्य यंत्रणेची परीक्षा पाहिली. पण दोन्ही वेळेला शैलजा यांची दुरदृष्टी कामी आली. त्यामुळे त्यांना रॅाकस्टार आरोग्यमंत्री म्हणूनही केरळमध्ये ओळखले जाते. या निवडणुकीत त्या विजयी होतील, असा विश्वास सर्वांनाच होता. पण त्यांना मिळालेले मताधिक्य हे त्यांच्या कामाचे मतदारांनी केलेले कौतुक असल्याची चर्चा केरळमध्ये रंगली आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात मात्र, त्यांना अपयश आल्याचे दिसते. महाराष्ट्रानंतर देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळून आले. पण याच कालावधीत विधानसभेच्या निवडणुका असल्याने त्यांनाही अनेक मर्यादा आल्या. असे असले तरी त्यांनी बसविलेल्या आरोग्य यंत्रणेच्या घडीमुळे केरळचा मृत्यूदर सर्वात कमी 0.4 टक्के एवढाच आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख