कैद्यांना मोबाईल पुरवणे पडले महागात... अलिबाग कारागृहातील दोन पोलीस निलंबित. - Alibag jail police suspended for giving mobile phones to inmates | Politics Marathi News - Sarkarnama

कैद्यांना मोबाईल पुरवणे पडले महागात... अलिबाग कारागृहातील दोन पोलीस निलंबित.

दिनेश पिसाट 
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

कैद्यांना स्वतःचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे समोर आले आहे. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

अलिबाग  : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात कारागृहात असलेले रिपब्लिक टीव्‍हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरवल्याची बाब दोनच दिवसांपुर्वी समोर आली होती. आता कैद्यांना मोबाईल फोन पुरविल्याच्या प्रकरणी अलिबागच्‍या दोन कारागृह पोलीसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

गोस्‍वामी यांना अलिबाग कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे त्‍यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याची बाब समोर आली होती. यानंतर तीनही आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने खातेनिहाय चौकशी सुरु केली होती. इतर कैद्याकडेही याबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी कारागृहातील दोन पोलीस पैसे घेऊन कैद्यांना स्वतःचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे समोर आले आहे. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु असल्याचेही कारागृह अधिक्षक ए. टी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी यांचा कागदोपत्री तुरुंगात मुक्काम असला तरी त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम मात्र, अलिबागमधील महापालिकेच्या शाळेतच होता. परंतु, गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची रवानगी थेट तळोजा तुरुंगात केली आहे. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होती. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले होते. 

शाळेत गोस्वामी हे मोबाईल वापरत असताना सापडले. यामुळे त्यांची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली. या विषयी रायगड पोलिसांनी म्हटले आहे की, गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना कोणाचा तरी मोबाईल घेऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. वरळीतील निवासस्थानातून गोस्वामींना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईलही जप्त केला आहे. यामुळे अलिबाग तुरुंगाच्या अधीक्षकांना आम्ही पत्र दिले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो, असा प्रश्न आम्ही विचारला होता. यामुळे त्यांनी गोस्वामी यांना तातडीने तळोजा तुरुंगात हलवले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख