#आक्रोश मोर्चा : आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी.. मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात - Akrosh Morcha Today Pandharpur to Mantralaya Dindi  Police deployed in the temple area | Politics Marathi News - Sarkarnama

#आक्रोश मोर्चा : आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी.. मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन आज सकाळी 11 वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केलं आहे.

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे. श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन आज सकाळी 11 वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केलं आहे 

आंदोलनामुळे येथील एसटीची सेवा ठप्प झाली आहे. यामध्ये एसटीला 20 लाख रुपयांचा फटका बसला आहे. आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या एसटीला विविध आंदोलनांचा फटका सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवासी वाहतूक बंद ठेवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. संचार बंदी लागू केली आहे.
 पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय, ड्रोन द्वारे पोलिसांची आंदोलनस्थळी नजर असणार आहे.

पंढरपूर प्रशासनाने केलेलं आवाहन धुडकावत मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज बांधव ते पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पंढरपूर ते पाय मुंबई पायी दिंडी काढू नये, यासाठी काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर मराठा समाज बांधव ठाम आहेत.
 
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कालपासून दोन दिवस पंढरपुरात येणारी आणि बाहेर जाणारी एसटीची प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे. काल दिवसभरातील 1200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दोन दिवसांमध्ये एसटीला  सुमारे 20 लाखाचा फटका बसला आहे, अशी माहिती येथील आगार प्रमुख ए. एस. सुतार यांनी दिली. 
 
या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव पंढरपुरात दाखल होत असतानाच, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कालपासून पंढरपुरातून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा होणारी प्रवासी वाहतूक दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय असा दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. 

पंढरपुरातून दिंडी मोर्चा काढण्याबाबत मराठा आंदोलक ठाम असून, अनेक मराठा कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांची जादा कुमक बोलावण्यात आली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने  शनिवारी (ता. 7) रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा मराठा समाजबांधवांनी निषेध करत संचारबंदीच्या आदेशाची ठिकठिकाणी होळी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख