अजितदादा नाराज नाहीत, कोणताही मंत्री घरी जाणार नाही.... - Ajitdada is not upset, no minister will not resign says Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा नाराज नाहीत, कोणताही मंत्री घरी जाणार नाही....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत, असे वृत्त मी वाचले. कुठे आहेत अजितदादा नाराज? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी योग्य त्या काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेकांना कोरोनाने त्रास दिला. त्यामुळे आपण सगळ्यांबाबतीत काळजी घेत आहोत. त्यासाठी अधिक खबरदारी म्हणून अजित पवार येथे उपस्थित नाहीत. त्यामुळे पक्षात खडसेंच्या प्रवेशावर काही गडबड नाही, अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेशाबाबत माझ्याशी चर्चा करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही. लोकांचे काम करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत. जे आहेत ते तेथे राहतील, असा निर्वाळा त्यांनी दिला.  जळगावला जाऊन जबरदस्त शक्तिप्रदर्शन तेथे करू, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले.

आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी आपल्या भाषणाची पवार यांनी सुरवात केली. नवी पिढी राष्ट्रवादीत सहभागी व्हायला उत्सुक आहे. संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. काही ठिकाणी पक्ष संघटनेची ताकद वाढविण्याची गरज आहे अशा ठिकाणी खानदेशाचा विचार मी करतो. जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी पक्ष वाढविण्यासाठी एकनाथ खडसे यांचा उपयोग होईल. एके काळी गांधी-नेहरूंच्या विचारांचा पगडा खानदेशवर होता. पक्षाच्या विचारधारेबाहेर काम करायचे नाही, असे मानण्याची प्रथा घराघरात होती. खानदेशात अनेक नेते होऊन गेल्या. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, मधुकरराव चौधरी, अरुण गुजराती या खानदेशातील नेत्यांचा उल्लेख पवार यांनी भाषणात केला. काॅंग्रेसच्या विचारधारेला मधल्या काळात गळती लागली. तेथे भाजपची नवी पिढी तयार करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले. सर्व प्रकारच्या स्थानांवर भाजपची सत्ता निर्माण झाली त्यामागे खडसे होते. त्यामुळे तेथील चित्र बदलले.

या नंतरच्या काळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारांनी चालणारा जिल्हा म्हणून जळगाव यापुढे पाहायला मिळेल, असा शब्द एकनाथ खडसेंनी दिला आहे. नाथाभाऊंचा शब्द म्हणजे शब्द. त्यात मागेपुढे होणार नाही. त्यामुळे जळगावातील चित्र नाथाभाऊ बदलून दाखवतील, असा मला विश्वास आहे.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख