अजितदादांचा कंगनावर निशाना : त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही  - Ajit Pawar's target on Kangana: He doesn't need to be taken seriously | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांचा कंगनावर निशाना : त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्र पोलिसांनी नेहमीच नियम, कायद्याचे पालन केले आहे. आपले कर्तव्य पार पडताना संवेदनशीलता जपली आहे.

मुंबई : "जगातील अव्वल, नंबर एकचे पोलिस म्हणून महाराष्ट्र, मुंबई पोलिस दलाची ओळख आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. राज्याला आपल्या पोलिसांचा अभिमान आहे, त्यामुळे बाहेरून येऊन कोण काय बोलतंय, काय आरोप करतात, त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही,' अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेत्री कंगना रनौटवर निशाना साधला. 

मीरा भाईंदर-वसई विरार या नव्या आयुक्तालयाचे उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, नवे आयुक्त सदानंद दाते या वेळी उपस्थित होते. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्‍वास दाखवत त्यांच्याकडून सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. तसेच, तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्‍मीरशी केली होती. त्यावेळी राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे रण माजले होते. विशेषतः कंगना आणि शिवसेना नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. तोच धागा पकडून अजित पवार यांनी मीरा भाईंदर-वसई विरार आयुक्तालयाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात नामोल्लेख टाळून कंगनावर अप्रत्यक्षपणे टीका केली. 

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी नेहमीच नियम, कायद्याचे पालन केले आहे. आपले कर्तव्य पार पडताना संवेदनशीलता जपली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दंगली, बॉम्बस्फोट, पूरस्थिती अशा संकटाच्या वेळी रस्त्यावर उतरून जनतेचे रक्षण केले आहे. प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले आहे. 

"कोरोना संकटाच्या काळात जोखीम पत्करून नागरिकांसाठी पोलिस लढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरील उपाशी लोकांचीही सोय याच आपल्या पोलिस बांधवांनी केली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. कोरोना महामारीच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या इतिहास नक्कीच होईल. पोलिसांच्या कुटुंबीयांनी या काळात केलेला त्यागही राज्यातील जनता कधीही विसरणार नाही,' असे अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, कोरोनाच्या काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच दिले आहे. पोलिस शिपायांना अनुकंपा तत्त्वार नोकरी देता येते. पण, अधिकाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख व इतर अधिकाऱ्यांनी याचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

पोलिसांना ड्यूटी करताना वेळेचे बंधन नसते, त्यामुळे पोलिस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या लोकांना नियुक्तीची ठिकाणे द्यावीत, अशी सूचनाही त्यांनी या वेळी नवे आयुक्त दाते यांना केली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख