पूजा चव्हाण प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही : उपमुख्यमंत्री - ajit pawar will not support anyone in Pooja Chavan death case Deputy CM | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही : उपमुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

"पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण तपासात राजकीय हस्तक्षेप नाही, " असे  अजित पवार यांनी सांगितले.

पुणे :  "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. त्यांना चैाकशी वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही, " असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शिवनेरी येथे शिवजयंती कार्यक्रमास अजित पवार उपस्थित होते, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पुण्यातील पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने विविध आरोप करण्यात येत आहेत. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. काल ते पोहरादेवी येथे येणार, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांना दिली होती. पण मंत्री राठोड काल आलेच नाहीत. दरम्यान समाजातील संत, महंत आणि तांडाप्रमुखांची बैठक काल पोहरादेवी येथे झाली. त्यानंतर राठोड केव्हा येतील, हे माहिती नाही. पण ते येतील त्याच्या दोन दिवस आधी माध्यमांना कळवू, असे सुनील महाराज यांनी काल माध्यमांना सांगितले. 

पोहरादेवी येथे झालेल्या बैठकीला महंत बाबूसिंग महाराज, संजय महाराज, जितेंद्र महाराज, कबिरसिंग महाराज, शेखर महाराज आणि तांड्यांतील प्रमुख मंडळी उपस्थित होती. परमपूज्य संत सेवालाल महाराज, महंत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीस्थळावर राठोड यांनी दर्शन घ्यावे आणि ज्या धडाडीने ते यापूर्वी काम करीत होते, त्याच धडाडीने पुढे त्यांनी काम सुरू ठेवावे, समाज त्यांच्या पाठीशी आहे, असेही सुनील महाराज यांनी यावेळी सांगितले. आजच्या बैठकीत संजय राठोड यांच्याबाबत पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र बैठकीत संजय राठोड यांच्यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. 

पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी कुठलाही आरोप केला नाही. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावात येऊ नये आणि कुठलाही निर्णय घेऊ नये. तसेच संजय राठोड यांनी याठिकाणी आपल्या कुटुंबासह येऊन येथील विकास कामांचा आढावा घ्यावा. धर्मपिठाधीश्‍वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थान ट्रस्टी अध्यक्ष कबिरदास महाराज, सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या सर्व संत महंतांनी चर्चा केली. यानंतर जितेंद्र महाराज आणि कबिरदास महाराज यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या संदर्भात भाविकांना काही महत्वाच्या सूचना द्यायच्या होत्या, त्याबाबत आम्ही चर्चा केली.   

पोलिस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात प्रमुख माहितगार असलेला अरूण राठोड याचा शोध पोलिस घेत आहेत. या मृत्यू प्रकरणामध्ये कथित मंत्र्यासोबत राठोडचा संवाद असल्याने तो एकदम झोतात आला आहे. अरुण राठोड याच्याशी बोलतानाच संबंधित मंत्री पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्याच्या सूचना करताना ऐकू येत होते. पोलिसांनी त्याचा जबाब घेतला असून त्याच्या जबाबात पूजाने मद्य प्राशन केल्याचे म्हटले होते. त्याच्या मोबाईलमधील सर्व आॅडिओ क्लिप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने घेऊन त्या व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणातील गंभीरपणा अनेकांच्या लक्षात आला. तो वनखात्याचा कर्मचारी असल्याचेही बोलले जाते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख