अजितदादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे : चंदन सोंडेकर  - Ajit Pawar should be made the Chief Minister: Chandan Sondekar | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे : चंदन सोंडेकर 

भरत पचंगे
गुरुवार, 30 जुलै 2020

अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पक्षाने विराजमान करायला पाहिजे, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. 

शिक्रापूर (पुणे) : नेतृत्वगुण हेरुन त्यांना त्यांच्या क्षमतेइतकी संधी देणे हे कुठल्याही राजकीय पक्षाचे धोरण असते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, काँग्रेसचे नेते सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील आदींनी पक्षाकडून मिळालेल्या संधी एका विशिष्ट वयाच्या टप्यावर मिळाली.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चाळीशीतील मुख्यमंत्रीपद तर, राज्यातील सर्वात बलाढ्य, आक्रमक, सक्षम व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विद्यमान उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा तुलनात्मक अभ्यास करता आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पक्षाने विराजमान करायला पाहिजे, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. या विषयाची चर्चा तीन मुद्द्यांवर व्हायला हवी : १. व्यक्तिमत्व २.पक्षसंघटना व ३.पक्षनेतृत्वाची पारख.
      
व्यक्तिमत्व : ऐन चाळीशीत मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे उपराजधानी नागपूरमध्ये  नगरसेवक, महापौर अशा चढत्या क्रमाने त्यांनी प्रदेश भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे आमदार, प्रदेशाध्यक्ष ते थेट मुख्यमंत्री हा प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्वाला पक्षाने दिलेल्या न्याय असेच म्हणावे लागेल. चतुरस्त्र अभ्यास, राजकारणाबरोबरच प्रशासनावर पकड, प्रचंड युक्तीवादाची क्षमता, स्वत:चा फॉलोवर्सचा मोठा वर्ग आणि पक्षनेतृत्वाचा प्रचंड विश्वास... असे सगळेच व्यक्तिमत्वातील पैलू फडणवीसांना लाभल्याने त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास चाळीशीत झाला. अर्थात फडणवीसांपेक्षाही काकणभर जास्तच गुणांनी भरलेले, वक्तशीर, स्पष्टोक्ते आणि प्रशासकीय जबरदस्त पकडीचे अजित दादा मात्र परिपूर्ण व्यक्तीमत्वाचे असतानाही त्यांना मात्र वयाची एकसष्ठी उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच घेऊन आली. याबाबत खरोखरीच राज्याने विचार करावा.

पक्षसंघटना : पक्षकार्यकर्त्याच्या क्षमतेचे मुल्यांकन करण्याची व्यवस्था असलेला देशातील एकमेव पक्ष म्हणून माझ्या पाहण्यात तरी एकमेव असलेल्या भाजपाचे कौतुक करायला हरकत नसावी. हिंदूत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना, भाजपाच्या विविध स्तरावरील आघाड्या-मोर्चे यांच्या अत्यंत वक्तशीर आणि भारावून टाकणा-या संघटना रचनेमुळे या पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमताच त्याला हवे ते देत असते. यामुळेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलूनही फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात हे सध्या तरी केवळ भाजपमध्येच  होऊ शकते.  मात्र, पक्षकार्यकर्त्याच्या क्षमतेचे मुल्यांकन व्यवस्थेचा अभाव, नेत्यांच्या शिफारशीमुळेच पद आणि संधीची पध्दती,  क्षमता असलेल्यांच्या विरोधात एक मोठी फळी बंडखोरीची भाषा करुन क्षमतावाल्यांना डावलण्याच्या राजकारणाचा प्रकार थेट-थेट ज्या पक्षात होतो.  तिथे अजितदादांसारख्यांना सन २००९-१४  या पंचवार्षिकमध्ये कॉंग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही मुख्यमंत्रीपदी न बसविण्याचे राजकारण हाच दादांनी पहाटे भाजपाबरोबर उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला जाण्यासाठीचे प्रेरक-कारण ठरलेय याला कुणीही नकार देणार नाही. 

पक्षनेतृत्वाची पारख : पक्षसंघटनेत क्षमता असलेल्यांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी देण्याचा प्रकार जो भाजपात होतो तोच राष्ट्रवादीत असता तर अजितदादांना आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाले असते.  कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आणि आता महाआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अस्तिस्व किती महत्वाचे आहे, हे शिवसेना-कॉंग्रेसला नेमकेपणाने ठाऊक आहे.  मात्र, अजितदादांना यावेळीही तात्काळ कोरोनाच्या भीषण संकटप्रसंगी, पुढील अडीच वर्षे किंवा ठरेल तसे मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे,  हीच दादांच्या मुख्यमंत्रीपदाची खंत दूर केली गेली तर "भाजपा सारखे राष्ट्रवादीतही पक्षनेतृत्व नेतृत्वाची पारख करते आणि नेमकी संधी देते.." हा मेसेज राज्यभर आणि विशेषत: राष्ट्रवादीच्या गावागावातील कार्यकर्त्यापर्यंत जाईल. गेली दोन पंचवार्षिक ४२-५४ आमदार संख्येत अडकेलेल्या राष्ट्रवादीला स्वबळाने मुख्यमंत्रीपदापर्यंत जाता येईल हेही पक्षाचे स्वप्न सत्यात येईल हे नक्की.

 चंदन सोंडेकर ( माजी प्रदेश-प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस )

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख