थकहमीच्या माध्यमातून अजित पवारांची साखरपेरणी 

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दुरावलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्याला राज्यात सर्वात जास्त 33 कोटींचीथकहमी मिळाली आहे
Ajit Pawar helps factories of leaders who have distanced themselves from the NCP
Ajit Pawar helps factories of leaders who have distanced themselves from the NCP

पुणे : राज्यातील सुमारे 32 सहकारी साखर कारखान्यांना महाविकास आघाडी सरकारने 516 कोटी 30 लाख रुपयांची थकहमी देत ऊस गाळपासाठी त्यांना मदतीचा हात दिला आहे. सर्वाधिक 114 कोटी 67 लाखांची थकहमी सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला आली आहे. 

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दुरावलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्याला राज्यात सर्वात जास्त 33 कोटींची, तर त्यानंतर पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भालके यांच्या कारखान्याला 31 कोटींची थकहमी मिळाली आहे. 

भाजप सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दुरावलेल्या नेत्यांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न  ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थकहमीच्या निर्णयातून केल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात आहे. ही साखरपेरणी करताना राष्ट्रवादीने सहकार क्षेत्रावरील आपली मांड पुन्हा पक्की करण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरातील सहा कारखान्यांना मदत करत या जिल्ह्याविषयी असणारा विशेष जिव्हाळाही जपण्यात आला आहे. 

थकहमी संदर्भात राज्य सरकारने शुक्रवारी अद्यादेश काढला आहे. घेतलेल्या कर्ज फेडीसाठी संबंधीत कारखान्याच्या संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारी असणार आहे, असे या परित्रपकामध्ये म्हटलेले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार भालके यांच्या विठ्ठल कारखान्यास (30 कोटी 98 लाख), पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे पण, निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेले कल्याण काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्यास (14 कोटी 52 लाख), राष्ट्रवादीचे खासदार राहिलेले धनंजय महाडिकांच्या "भीमा'स (20 कोटी 22 लाख), पूर्वीचे कॉंग्रेसचे आणि सध्या शिवसेनेत असलेले समाधान आवताडे यांच्या "संत दामाजी'स (10 कोटी 58 लाख), विलासराव देशमुखांचे मित्र, माजी आमदार धनाजी साठे (यांच्या मुलाने भाजपत प्रवेश केला आहे) यांच्या "कुर्मदास'ला (5 कोटी 15 लाख) आणि राष्ट्रवादीचे माजी नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या "सहकार महर्षी'ला (33 कोटी 24 लाख) राज्य सरकारने हमी दिली आहे. 

सोलापूरबरोबरच नगरमधील विखे पाटील (विखे पाटील), कोल्हे (शंकरराव कोल्हे), बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (लोकनेते सुंदरराव सोळंके), माजी मंत्री पंकजा मुंडे (वैद्यनाथ), पुणे जिल्ह्यातील सत्यशील शेरकर (विघ्नहर), शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (घोडगंगा), इंदापूरचा छत्रपती साखर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (नीरा-भीमा), भोरचे आमदार संग्राम थोपटे (राजगड), वाईचे मदन भोसले (किसन वीर), माजी मंत्री बसवराज पाटील (विठ्ठलसाई, उमरगा) आदी प्रमुख राजकीय नेत्यांच्या कारखान्यांना ही थकहमी मिळाली आहे.

यातील बहुतांशी मंडळी ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. काहींनी निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला आहे. या दुरावलेल्या मंडळींना मदत करून महाविकास आघाडीने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. 

अमित शहांना भेटलेल्या 'दोन दादां'ना मात्र प्रतीक्षा 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्या कारखान्याला मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणारे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या "भीमा-पाटस' आणि विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या "शंकर सहकारी' या कारखान्यांस मात्र अजूनही राज्य सरकारकडून मदत मिळू शकलेली नाही. या साठी या दोन्ही आमदारांनी फडणवीस यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. 

राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही मदनसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील "सहकार महर्षी' कारखान्यास मिळालेली आहे. त्यामुळे रणजितदादांच्या नेतृत्वाखालील कारखान्यास अजूनही मदतीचा अपेक्षा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com