`इमेज मेकिंग` धोक्यात आल्यानंतर अजित पवारांनी `इमेज` लगेच सावरली : ते कंत्राट रद्द - ajit pawar cancels order of giveing tender for his image making | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

`इमेज मेकिंग` धोक्यात आल्यानंतर अजित पवारांनी `इमेज` लगेच सावरली : ते कंत्राट रद्द

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 मे 2021

सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई  : उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. हा सोशल मिडिया सांभाळण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च येणार होता. त्यावरून टीका झाल्याने अजित पवारांनी तो रद्द करण्याचा निर्णय़ घेतला.

उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा : अजित पवारांची इमेज मेकिंग पडणार सहा कोटींना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडीया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.

मलिक यांची भाजपवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारासाठी जो खर्च होणार होता त्याकडे जे बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः सत्ता असताना किती खर्च केला याकडे लक्ष द्यावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  खात्याच्या प्रचार व प्रसारावर ६ कोटी रुपये खर्च होत आहेत असा आरोप होत असून त्यावर नवाब मलिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. सरकारमध्ये काम करत असताना  प्रचार व प्रसार, माहिती देणे गरजेचे असते पण सहा कोटी रुपये खर्चावर जे लोक बोट ठेवत आहेत त्यांनी त्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री व प्रत्येक मंत्र्यांवर किती पैसे खर्च केले यावर लक्ष द्यायला हवे असेही नवाब मलिक म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख