कृषीमंत्री दादा भुसे यांचे बाळा नांदगावकरांना उत्तर..  - Agriculture Minister Dada Bhuse reply to Bala Nandgaonkar | Politics Marathi News - Sarkarnama

कृषीमंत्री दादा भुसे यांचे बाळा नांदगावकरांना उत्तर.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत. त्याचं प्रारुप तयार करुन लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार आहे," असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

मुंबई : “ज्या ज्या ठिकाणी घटना घडत आहेत, त्या-त्या ठिकाणी माझ्यासारखे कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आहोत. दर आठवड्यात कॅबिनेट बैठकीत या विषयावर चर्चा होते आहे. मला संबंधितांना सांगायचे आहे की एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत. त्याचं प्रारुप तयार करुन लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार आहे," असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

"मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण, आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन (online) बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा "ठाकरे' नावावरील विश्वास उडेल," असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल दिला होता. यावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी नांदगावकर यांना उत्तर दिले आहे. 

गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे, त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढून ठेवलेली पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला सरकारची मदत अत्यंत आवश्‍यकता आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु सध्याच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे, त्याला शेताच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याची गरज आहे. अशा वेळी नेहमीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने पंचनाम्याचा आदेश देऊन भागणार नाही, तर या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन हे काम करावे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी ट्विटमधून केली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात घराबाहेर पडून पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. पण, ठाकरे यांनी पुणे दौरा सोडता घरातूनच कारभार हाकला आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. पण, मनसेने आत्तापर्यंत ठाकरे यांच्यावर थेट टिका केली नव्हती. 

तोच धागा पकडून नांदगावकर यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्रीजी आतापर्यंत तुमच्यावर थेट टिका करण्याचे टाळत आलो आहे. आता मात्र शेतकऱ्यांचे आश्रु तुम्हाला ऑनलाइन पुसता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे आश्रु पुसा. त्यांना तातडीने आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा ठाकरे नावावर असणारा विश्‍वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख