शाहीन बागच्या धर्तीवर 'वंचित'चे "किसान बाग" आंदोलन 

शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व जिल्ह्यात "किसान बाग" आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
pa15.jpg
pa15.jpg

मुंबई : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व जिल्ह्यात "किसान बाग" आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

वादग्रस्त नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सिमेंवर शेतकरी आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच 17 डिसेंबर रोजी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू ठेवून मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकर्‍यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय 'किसान बाग' आंदोलन करण्याची घोषणा सदर मेळाव्यात करण्यात आली. 

या मेळाव्याला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्मांध जातीयवादी शक्तींनी देशातील शेकडो मुसलमानांचा छळ करत माॅबलिंचींग सारखे अत्याचार केले, हजारो दलितांचा शोषन सुरु आहे परंतु वर्तमान व्यवस्थेने लाखो शेतकऱ्यांचा इतका छळ केला की त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. याला आम्ही शासन पुरुस्कृत हत्या समजतो. या वरुन देशात शेतकरी हा सर्वात अत्याचार पिडीत आहे व सर्व पिडित-शोषीत घटकांनी एकत्रीत येऊन शेतक-यांच्या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे.

आंबेडकर  म्हणाले की सिएए एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्ता व अधिकारांचे दुरुपयोग करत दिल्लीतील शाहीन बाग चळवळीला चिरडण्याच प्रयत्न करत होते. त्यावेळी पंजाबच्या निरनिराळ्या भागातील शेतकऱ्यांनी शाहीन बागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखवले होते आणि आत्ता पंजाबमधील शेतकर्‍यांशी एकरुपता व सहानुभूती दाखवत मुस्लिम समाजाने आपापल्या शहरांमध्ये किसान बाग आंदोलन सुरू करण्याचे घेतलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे. अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊच नये, असे आरएसएसचे षडयंत्र आहे म्हणून मुस्लिम व इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. हे अत्याचार पिडित घटकांना विभागून त्यांच्यावर अत्याचार करू इच्छित आहे म्हणून किसान बागच्या  माध्यमातुन या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरएसएससारख्या संघटनेला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असून  त्यासाठी सर्व उत्पीडित लोकांमध्ये ऐक्य असणे आवश्यक आहे असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ताई ठाकूर, राज्य प्रवक्ते फारूक अहमद, गोविंद दळवी, सिद्धार्थ मोकळे दिशा पिंकी शेख, वाशिम मंगरुलपीरचे नगराध्यक्षा डॅा गजाला खान, मुंबई किसान बाग तहरीर संयोजक अब्दुल बारी खान तसेच वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा व विधानसभा उमेदवार, जळगाव, अकोला, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, नाशिक, नांदेड, पुणे, वाशिम, अमरावती, परभणी, बुलढाणा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, पालघर, नवी मुंबई, बेलापूर, मीरा-भाईंदर, ठाणे, मुंब्रा व मुंबईतील गोवंडी, सायन, कांदिवली, धारावी, भायखळा, कुर्ला, वरळी व घाटकोपर मतदारसंघातील  अनेक पदाधिकारी व शेकडो मुस्लिम कार्यकर्ते व
नेते उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com