अजितदादा, तुम्हाला शेतातील सगळं समजत, तुम्ही गप्प का ? - An agitation in Pune under the leadership of Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा, तुम्हाला शेतातील सगळं समजत, तुम्ही गप्प का ?

सागर आव्हाड 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शेतीमधील उद्धव ठाकरे यांना समजत नसलं तरी अजित पवार यांना समजत आहे. त्यांनी तरी लक्ष घालावे. जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, असा इशारा चंद्रकात पाटील यांनी दिला आहे.

पुणे  : आधीच कोरोनामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ न मिळाल्याने त्याचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने गायीच्या प्रतिलिटर दुधाला दहा रुपये अनुदान आणि प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा, या मागणीकरीता भाजपतर्फै राज्यभर आंदोलन करण्यात येत  आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातही आंदोलन करण्यात आल. यावेळी माजी मंञी बाळा भेगडे, योगेश गोगावले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

राज्यात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. शेतीमधील उद्धव ठाकरे यांना समजत नसलं तरी अजित पवार यांना समजत आहे. त्यांनी ही लक्ष घालावे, आज गावोगावी आंदोलन झालं आहे. आमचं आंदोलन हिंसक नसेल असं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं. जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, असा इशारा चंद्रकात पाटील यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

सरकार संवेदनशील नाही हे दिसत सरकार ने खत बियाणे याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, याचा अर्थ सरकारला हप्ता जातोय का काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. अजित दादा तुम्हाला शेतातील सगळं समजत मग तुम्ही गप्प का ? असा सवाल पाटील यांनी केला आहे. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रुपयांचा दर द्यावा या मागण्यांसाठी   राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांची बैठक नुकतीच आयोजीत करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर व चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटांत सापडला असून दुधाचे भाव १६ ते १८ रूपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठरावीक दूध संघापूरतीच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे अशा भावना महायुतीतील घटक पक्षांनी व्यक्त केल्या. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख