विठ्ठलाच्या दारात दुधाची वारी करायला आलोय..   - Agitation in Pandharpur for milk price | Politics Marathi News - Sarkarnama

विठ्ठलाच्या दारात दुधाची वारी करायला आलोय..  

संपत मोरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महाविकास आघाडीनेही शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि दुधाला दरवाढ द्यावी."असे माजी दुग्धविकास मंत्री, आमदार महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

पुणे : "माझ्या मंत्रिपदाच्या काळात मी दुधाला सात रुपये दरवाढ केली. दुधाला एवढी दरवाढ देणारा देशातील मी पहिला दुग्धविकास मंत्री आहे. माझी स्वतःची डेअरी नाही. तरीही हा प्रश्न मी जिव्हाळ्याने सोडवला होता. शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन मी काम केले. महाविकास आघाडीनेही शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि दुधाला दरवाढ द्यावी."असे माजी दुग्धविकास मंत्री, आमदार महादेव जानकर यांनी म्हटले आहे. 

आज जानकर यांनी दुधाच्या दरासाठी पंढरपुरात आंदोलन केले. यावेळी त्यांनी चंद्रभागेत विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केले. गेल्या महिन्यातही राष्ट्रीय समाज पक्षाने 191 तालुक्यात दुधाच्या दरवाढीसाठी विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घातला होता. "कोरोनामुळे आषाढीची वारी करता आली नाही, म्हणून मी ही दुधाची वारी करायला आलोय. विठ्ठलाच्या दारात आलोय. नक्कीच ही लढाई यशस्वी होईल," असे जानकर म्हणाले.
 
"खाजगी दुध संघ शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला 20 रुपये देऊन तेच दूध ग्राहकाना 45 ते 60 रुपयापर्यंत देऊन दुपटीपेक्षाही जास्त कमाई करतात. तसेच मलई काढून घेतात. तेव्हा गुजरातच्या अमूल प्रमाणे राज्याचा एकच ब्रँड करुन  दूध उत्पादक व ग्राहक या दोघांचे हित साध्य करण्यासाठी खाजगी दुधाचे ब्रँड बंद करण्यासाठी हे आंदोलन फक्त दूध उत्पादकांपुरते मर्यादित न ठेवता ग्राहकांनीही आंदोलन करुन दुधात जनतेची लुट थांबवली पाहिजे," असे राष्ट्रीय समाज पक्षाने म्हटले आहे.

"आजच्या दूध आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे 191 तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी आहेत. आमचा एकही कार्यकर्ता टँकर फोडणार नाही किंवा दुधाची नासाडी करणार नाही. आम्ही गरिबांना मोफत दूध वाटणार आहोत. आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांनी साथ द्यावी," असे आवाहन जानकर यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातही आंदोलन करण्यात आल. यावेळी माजी मंञी बाळा भेगडे, योगेश गोगावले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. शेतीमधील उद्धव ठाकरे यांना समजत नसलं तरी अजित पवार यांना समजते. त्यांनी तरी लक्ष घालावे, आज गावोगावी आंदोलन झालं आहे.

 

 

आमचं आंदोलन हिंसक नसेल असं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं. जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, असा इशारा चंद्रकात पाटील यांनी यावेळी सरकारला दिला आहे. सरकार संवेदनशील नाही हे दिसत सरकार ने खत बियाणे याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, याचा अर्थ सरकारला हप्ता जातोय का काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. अजित दादा तुम्हाला शेतातील सगळं समजत मग तुम्ही गप्प का ? असा सवाल पाटील यांनी केला आहे. 

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख