रुपाली, तू प्रचार जोरात कर; बाकीचे मी बघतो : राज ठाकरेंकडून विचारपूस  - After the threatening case, Raj Thackeray interrogated Rupali Thombre Patil | Politics Marathi News - Sarkarnama

रुपाली, तू प्रचार जोरात कर; बाकीचे मी बघतो : राज ठाकरेंकडून विचारपूस 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

रूपाली पाटील-ठोंबरे यांना शनिवारी (ता. 21 नोव्हेंबर) जीवे मारण्याची धमकी आली होती.

पुणे : तू तुझा प्रचार जोरात कर बाकीचे मी बघतो, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 22 नोव्हेंबर) पक्षाच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रूपाली पाटील-ठोंबरे यांची विचारपूस करीत त्यांना धीर दिला. त्यांना शनिवारी (ता. 21 नोव्हेंबर) जीवे मारण्याची धमकी आली होती. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी ऍड. पाटील-ठोंबरे यांची फोन करून विचारपूस केली. 

साताऱ्यातून दाभाडे नाव असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने शनिवारी पाटील यांना एकेरीत धमकावत आमदार होण्याची स्वप्ने बघू नका, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात ऍड. पाटील यांनी तातडीने पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी ऍड. पाटील यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. "तू प्रचार जोरात कर, बाकीचे मी पाहून घेतो,' असे सांगत त्यांनी ऍड. पाटील यांना धीर दिला. 

पाटील यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला आहे. या पार्श्‍वमीवर पाटील यांना धमकीचा फोन आला आहे. काल दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दाभाडे असे नाव सांगितले असून आमदार होण्याची स्वप्ने बघू नका, असेल तिथे संपवून टाकू असे म्हटले होते. पाटील यांनी फोनचा सर्व तपशील पोलिसांना दिला असून पोलिसांनी अधिक तपासाला सुरवात केली आहे. या धमकीच्या फोननंतर पाटील यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील मतदार आहेत. पुण्यातील मतदारसंख्या सर्वाधिक असल्याने पुण्यातून प्रत्यक्ष मतदान अधिक झाल्यास त्यावरच निकाल अवलंबून राहण्याची शक्‍यता आहे. पुण्यातून होणाऱ्या मतदानामध्ये पाटील किती मते घेतात, हे पाहावे लागणार आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख