राजस्थान, पंजाबनंतर छत्तीसगडमध्येही काॅंग्रेसमध्ये सत्तासंघर्ष उफाळला... - After Punjab and Rajsthan power conflict in Chhatisgarh for congress | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थान, पंजाबनंतर छत्तीसगडमध्येही काॅंग्रेसमध्ये सत्तासंघर्ष उफाळला...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

राजस्थानमध्ये मुख्यमत्री अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार सचिन पायलट यांच्यातील संघर्षावर काॅंग्रेस नेतृत्वाला समाधानकारक तोडगा काढता आलेला नाही.

नवी दिल्ली : राजस्थान, पंजाब पाठोपाठ आता काॅंग्रेसशासीत छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्रीपदावरून गृह कलह पेटला आहे. विद्यमान सरकारमधील प्रभावी मंत्री असलेले टी. एस. सिंगदेव यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितल्याने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रविवारी (ता. 11 जुलै) दिल्लीत येऊन पक्ष श्रेष्ठींकडे कैफियत मांडली. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काॅंग्रेसला दोन तृतियांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्री बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रीपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून बघेल यांनी या वादाचा चेंडू सोनियांच्या दरबारी टोलावला आहे. (Chhatisgarh CM Bhupesh Baghel meets Congress leaders in Delhi)

राजस्थानमध्ये मुख्यमत्री अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार सचिन पायलट यांच्यातील संघर्षावर काॅंग्रेस नेतृत्वाला समाधानकारक तोडगा काढता आलेला नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक झाले असून प्रदेशाध्यक्ष पदावरून या दोन्हीही नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद टोकाला पोहोचला आहे. त्यात आता छत्तीसगडचीही भर पडली आहे. सत्तेबाहेर असल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या काॅंग्रेस पक्षाला रसद पुरविणारे म्हणूनही छत्तीसगडची ओळख आहे. तर, मुख्यमंत्री भुपेश बघेल हे गांधी कुटुंबियांच्या खास विश्वासातले मानले जातात. मात्र, या राज्यातही मुख्यमंत्री पदावरून सरकारमधील भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. आरोग्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी आता उर्वरित अडीचवर्षांसाठी मुख्यमंत्री पदावर हक्क सांगितला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनविताना सुरवातीचे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद बघेल यांच्याकडे तर उर्वरित कालावधीसाठी सिंगदेव यांना देण्याचा फाॅर्म्युला ठरला होता, असे सिंगदेव समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र बघेल यांनी असा कोणताही फाॅर्म्युला नसल्याचा पवित्रा घेतल्याने सिंगदेव यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टिकास्त्र सोडून नाराजी दाखविणे सुरू केले आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज दिल्लीत धाव घेऊन पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला. बघेल यांच्यावर राहुल गांधींचाही विश्वास असल्याचे मानले जाते. मात्र, आज बघेल यांना सोनिया किंवा राहुल गांधी यांची भेट होऊ शकली नाही. सरचिटणीस प्रियांका गांधी यांची त्यांनी भेट घेतली. तसेच काॅंग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि छत्तीसगडचे प्रभारी पी. एल. पुनिया यांची भेट घेऊन ते रायपूरला रवाना झाले. यादरम्यान पत्रकारांशी बोलताना, भूपेश बघेल यांनी नेतृत्व बदलाबाबत श्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल, असे सांगितले. अन्य कुणाला मुख्यमंत्री बनविण्याचे नेतृत्वाने सांगितल्यास तसे होईल. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याला शपथ घेण्यास सांगण्यात आले होते. अशा प्रकारचा समझोता (अडीच वर्षे पदवाटपाचा) आघाडीच्या सरकारमध्ये होत असतो, असाही टोला बघेल यांनी लगावला. राज्याचे प्रभारी पी. एल. पुनिया यांनीही मुख्यमंत्री बघेल यांची री ओढताना काही वर्षानंतर मुख्यमंत्री बदलण्याचा पक्षाचा कोणताही फाॅर्म्युला नाही, असे स्पष्ट केले. यातून बघेल यांना अभय मिळाल्याचे चित्र असले तरी सिंगदेव गटाने तलवारी अद्याप म्यान केल्या नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख