Exit Polls :  राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचाही 'निकाल' लागणार - after exit polls of five states difficult for Rahul Gandhi to get the Congress presidency again | Politics Marathi News - Sarkarnama

Exit Polls :  राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचाही 'निकाल' लागणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

मतदानोत्तर कल चाचणीतून (Exit Polls) एकाही राज्यात काँग्रेसला आशादायक चित्र नाही.

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी लागणार असले असले विविध  मतदानोत्तर कल चाचणीतून (Exit Polls) पाचही राज्यांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. एकाही राज्यात काँग्रेसला आशादायक चित्र नाही. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालासोबत काँग्रेसचे नेेते राहुल गांधीच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या फेरनिवडीचाही निकाल लागू शकतो. या निवडणुकींचे निकाल फेरनिवडील प्रतिकूल परिणाम करू शकतात. त्यासाठी राहुलविरोधी पक्षातील गट सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतिक्षा लागली आहे. येत्या दोन मे रोजी पाचही राज्यांचे निकाल जाहीर होती. पण तत्पुर्वी अनेक एक्झिट पोलचे कल काँग्रेससाठी फारसे आशादायक नाही. बंगालमध्ये काँग्रेस मागील विधानसभेच्या जागाही राखता येणार नाहीत. तर केरळ व आसाममध्ये सत्ता मिळवण्यासाठी केलेला जोरदार प्रचारही कामी येणार नाही, असे दिसते. 

तमिळनाडूत काँग्रेस दुय्यम असून केवळ 25 जागांवर निवडणूक लढवली आहे. तिथे डीएमकेसोबत निवडणूक लढवली असली तरी डीएमकेची सत्ता आल्यास काँग्रेसला फारसे महत्व मिळणार नाही. पुदुच्चेरीमध्ये सत्ता गेल्यानंतर पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता धुसर आहे. काँग्रेसला केरळ आणि आसाम या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक आशा आहे. राहुल गांधी यांनी प्रामुख्याने केरळमध्ये जोरदार प्रचार केला. तर प्रियांका गांधी यांनी आसाममध्ये अनेक सभा घेतल्या. पण दोन्ही राज्यांत काँग्रेसला सत्ता मिळताना दिसत नाही.

बंगालमध्ये राहुल गांधी यांनी चार टप्पे झाल्यानंतर केवळ दोन सभा घेतल्या. कोरोनामुळे पुढील दौराच त्यांनी रद्द केला. एकुणच पाचही राज्यांतील काँग्रेसची अवस्था राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या फेरनिवडीसाठी अडचणीची ठरू शकते. काही महिन्यांपूर्वीच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे पक्षाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातील काहींचा राहुल गांधी यांच्या अध्यक्ष होण्यालाही विरोध आहे. पाच राज्यांतील निकालानंतर या नेत्यांना बळ मिळू शकते. 

अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या असंतुष्ट गटाकडून राहुल यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या नव्या फळीच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीला जाब विचारण्याची तयारी चालविल्याचे कळते. कोरोना संकटाची तीव्रता पाहता पक्षातील धुसफूस लगेच समोर येण्याची शक्यता नसली तरी मे नंतर होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने नेतृत्वाच्या कार्यपद्धीचा मुद्दा पुन्हा जोर धरू शकतो.

पाचही राज्यांत पक्ष कमी पडला

पाचही राज्यांमध्ये प्रचारामध्ये पक्ष खूप मागे राहिल्याची चर्चा आहे. राहुल यांनी केरळमध्ये आठवडाभर प्रचार केला. त्याचवेळी आसाममध्ये पक्षाला आशा असतानाही तिकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. बंगालमध्येही राहुल गांधी खूप उशिरा दाखल झाले. तमिळनाडू केवळ एक-दोन दिवसच प्रचारात घालविले. तर पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर प्रचाराचे मनोधैर्य खचले. कुठेही प्रचाराची ठोस रणनीती दिसून आली नाही, असे बोलले जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख