After Ajit Dada's announcement, 'Sarathi' got Rs 8 crore in two hours ... | Sarkarnama

अजितदादा यांच्या घोषणेनंतर 'सारथी'ला दोन तासात आठ कोटी रूपये...  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 जुलै 2020

सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. ते पुन्हा सिद्ध झाले आहे. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पत्र पाठविण्यात आले आहे. त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सारथी संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येणार आहे. नियोजन विभाग हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. सारथीच्या विविध प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ''सारथी संस्था बंद पडणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहिल. संस्थेच्या काही प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडण्यात येणार आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक कसा होईल. याकडे लक्ष दिले जाईल. संस्थेबाबत राज्य सरकार सकात्मक आहे.

 

आम्ही सर्वांचे म्हणणे एकूण घेतले. राज्य सरकार सारथी ही सरकार बंद करणार नाही. चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सीताराम कुंटे यांना आम्ही अहवाल सादर करायला 14 दिवसांची मुदत दिली आहे. मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तारादूत, फेलोशिप यांचे विद्यार्थ्यांचे पैसे दिले जातील. सारथीला नियोजन विभागाच्या अंतर्गत घेतले जाईल. कौशल्य विभाग नियोजन विभागाच्या अंतर्गत घेण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेऊ.  मराठा समाजातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. सारथीची जी बदनामी झाली हे थांबावावी.''

संभाजीराजें म्हणाले, ''माझे मनोगत सभागृहात मांडायचे होते. अजितदादा पवार यांनी सारथी टिकवायची आहे, म्हणून ही बैठक घेऊ असे सांगितले होते, संस्थेची स्वायत्तता टिकवावी ही आमची मागणी आहे. अजितदादा पवार यांनी सारथीकडे जातीने लक्ष द्यावे. छत्रपती घराण्यातील व्यक्ती ही सेवक असते. मी समाजासाठी आलो होतो. कोणी ही आंदोलन करू नये..

आंदोलन करण्यापेक्षा सकारात्मक भूमीकेसाठी एकत्र यावे. संस्थेसाठी दशकाचा मास्टर प्लॅन सरकारने तयार करावा. ही संस्था शाहू महाराज यांचे जीवनस्मारक आहे. संस्थेची स्वायत्तता टिकवली पाहिजे.या संस्थेकडे आम्ही शिक्षणसंस्था म्हणून पाहतो. पवार यांनी संस्थेकडे जातीनं लक्ष घालावे.''
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख