खासदारांच्या अन्नत्यागानंतर उपसभापती हरिवंश यांचाही उपवास - After the abstinence from food Deputy Speaker Harivansh also fasted | Politics Marathi News - Sarkarnama

खासदारांच्या अन्नत्यागानंतर उपसभापती हरिवंश यांचाही उपवास

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदारांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचा अन्नत्याग जाहीर केला. 

नवी दिल्ली : राज्यसभेत आपल्याविरूध्द अविश्‍वास देणाऱ्या पक्षांच्या रात्रभर धरणे धरलेल्या 8 निलंबित खासदारांना सकाळचा चहा घेऊन उपसभापती हरिवंश आज सकाळीच गांधी पुतळ्याजवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून राष्ट्रपती व सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून 24 तासांचा उपवास करण्याचा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधानांनी तत्काळ त्यांच्या पत्राची दखल तर घेतलीच पण या मुद्याचा थेट बिहारचा अत्यंत सूचक उल्लेखही केला. तोंडावर आलेल्या बिहार निवडणुकीत भाजप-जदयू आघाडी हरिवंश यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा थेट संबंध बिहार अस्मितेशी जोडून तापवणार यावर यामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाले. 

दरम्यान धरणे आंदोलन करणाऱ्या आठही निलंबित खासदारांना काल रात्री जेवण पाठविण्याबाबत सभापतींकडूनही विचारणा केली गेल्याचे वृत्त आहे. या साऱ्यांनी त्यांच्याकडून आलेला प्रस्तावही विनम्रपणे नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले. गांधी पुतळा परिसरात रात्री डासांचे साम्राज्य असते. त्यामुळे रात्रभर तेथेच राहण्याचे जाहीर केलेल्या या खासदारांसाठी सभापतींच्या सूचनेवरून मोठमोठे पंखे लावण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर या सर्वांनी संसदेच्या स्वागतकक्षात जाऊन थांबावे, यासाठी सुरक्षा यंत्रणेने त्यांची मनधरणीही केली. 

हरिवंश आज सकाळी गांधी पुतळ्याजवळ बसलेल्या आंदोलकांकडे आले. मात्र त्यांचा चहा निलंबित खासदारांनी नाकारल्याने त्यांची ही गांधीगिरी कामी आली नाही. "हरिवंश यांचा चहा आम्हाला नको' अशी स्पष्ट भूमिका डेरेक ओब्रायन व संजय सिंह यांच्यासह आठही खासदारांनी घेतली. ओब्रायन यांनी, जर हरिवंश सच्च्या मनाने आले असतील तर त्यांनी आपल्याबरोबर कॅमेरे का आणले? असा भेदक सवाल उपस्थित केला. हरिवंश यांचे पत्र ज्या गतीने प्रसिध्दीला देण्यात आले व मोदींनी त्याची जी तत्काळ दखल घेतली ती पहाता ओब्रायन यांच्या मुद्यात तथ्य असल्याचे जाणकार मानतात.

संजय सिंह म्हणाले की हरिवंश यांनी व्यक्तिगत स्नेहापोटी चहा आणला असला तरी या काळ्या कायद्याविरोधात देशातील हजारो शेतकरी उपाशीतापशी आंदोलन करत असताना आम्ही इथे (चहा पिऊन) त्यांच्याशी असलेले व्यक्तिगत नाते कसे जपणार ? जेव्हा ते आमच्या घरी येतील तेव्हा आम्ही त्यांच्याप्रती व्यक्तिगत स्नेह जोपासू. पण इथे आम्ही शेतकऱ्यांसाठी व काळा कायदा मागे घ्यावा यासाठी बसलो आहोत. 

यानंतर काही वेळातच हरिवंश यांचे पत्र सार्वत्रिक झाले. पंतप्रधानंनी त्यांचे पत्र शेअर करून ट्विटवर म्हटले की या पत्रात सच्चाई आहे व संवेदनाही आहे. सर्व देशवासीयांनी हे पत्र जरूर वाचावे. काही दिवसांपूर्वी ज्यांनी त्यांचा अपमान केला त्यांच्यासाठी हरिवंश आता चहा घेऊन पोहोचले. 

हरिवंश यांनी पत्रात म्हटले की 20 सप्टेंबरला वरिष्ठ सभागृहात जे दृश्‍य होते त्यामुळे सभागृह , पीठासीन आसनाची मर्यादा यांना मोठे नुकसान झाले. लोकशाहीच्या नावावर हिंसक व्यवहार झाला. आसनावरील व्यक्तीला धमकावण्याचा प्रयत्न झाला. नियम पुस्तिका फाडण्यात आली. दोन दिवसांपासून मी आत्मपीडा, आत्मतणाव व मानसिक वेदनेत आहोत. कालची सारी रात्र मी झोपू शकलो नाही. मला वाटते माझ्याबरोबर अपमानास्पद व्यवहार झाला. त्याबद्दल मला एका दिवसाचा उपवास केला पाहिजे. कदाचित त्यामुळे सदस्यांमध्ये आत्मशुध्दीची भावना जागृत होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख