इराणवरील निर्बंधांचे पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा! अमेरिकेचा इशारा  - Adhere to sanctions on Iran or face the consequences! US warning | Politics Marathi News - Sarkarnama

इराणवरील निर्बंधांचे पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा! अमेरिकेचा इशारा 

वृत्तसंस्था
रविवार, 20 सप्टेंबर 2020

इराणविरोधात सर्वसमावेशक करार होत नाही, तोपर्यंत असाच दबाव कायम ठेवणार असल्याचा निश्‍चय ट्रम्प प्रशासनाने जाहीर केला आहे.

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांनी इराणवर पूर्वी लागू केलेले निर्बंध अमेरिकेने आजपासून पुन्हा एकदा लागू केले आहेत. तसेच, हे निर्बंध ज्या देशांना मान्य नसतील त्यांच्यावरही निर्बंध घालण्याचा आमचा विचार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी आज जाहीर केले. 

इराणविरोधात सर्वसमावेशक करार होत नाही, तोपर्यंत असाच दबाव कायम ठेवणार असल्याचा निश्‍चय ट्रम्प प्रशासनाने जाहीर केला आहे. मात्र अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला युरोपीय देशांचा विरोध आहे. 

इराणने त्यांच्या अणु कार्यक्रम बंद करण्याच्या बदल्यात त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध उठविण्याबाबतचा शांतता करार झाला होता. अमेरिकेसह सहा जागतिक शक्तींचा या करारात समावेश होता. मात्र, यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद मिटला नाही आणि इराणकडून वारंवार कराराचा भंग होत असल्याची टीका करत अमेरिकेने पासून करारातून अंग काढून घेतले. 

त्यांनी इराणवर आर्थिक निर्बंधही लागू करण्यास सुरुवात केली. अमेरिका करार पाळत नसल्याने इराणनेही पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्या सुरु करत अमेरिकेला वारंवार डिवचले. यामुळे चिडलेल्या अमेरिकेने इराणवर संयुक्त राष्ट्रांचे पूर्वीचे निर्बंध पुन्हा लागू करणार असल्याचे जाहीर केले होते, त्याची आज त्यांनी अंमलबजावणी केली. 

ब्रिटन, फ्रान्ससारख्या करारातील इतर सहभागी देशांनी मात्र अमेरिकेला विरोध करत त्यांच्या या निर्बंधांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एकाकी पडलेल्या अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रांच्या सर्व देशांना इराणवरील निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन करतानाच असे न करणाऱ्याला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख