मुंबईत सेनेसाठी रोज डोकेदुखी : आता कंगना जाणार राज्यपालांच्या भेटीला - Actress Kangana Ranaut to meet governor koshiyari on Sunday | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत सेनेसाठी रोज डोकेदुखी : आता कंगना जाणार राज्यपालांच्या भेटीला

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

शिवसेनेसाठी मुंबईत रोज नवीन वाद निर्माण होत असून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीच्या घटनेने देशभरातून सेनेवर टीका झाली. आता कंगना राज्यपालांच्या भेटीला रविवारी जात आहे. त्यामुळे पुन्हा मुंबई आणि शिवसेना देशभर चर्चेत राहणार आहे. 

मुंबई, ता. 12 : गेल्या काही दिवसांत मुंबईत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी असलेली अभिनेत्री कंगना राणावत रविवारी (ता. 13) राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची दुपारी 4.30 वाजता भेट घेणार आहे.

कंगनाचे कार्यालय असलेल्या इमारतीतील अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे राज्यपाल कोश्‍यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय महेता यांना बोलावून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र, पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. तसेच कंगनाच्या मागे भाजप असल्याचीही टीका करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कंगना आणि राज्यपालांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कंगनाच्या बांधकामावर मुंबई महापालिकेने अन्यायकारक कारवाई केल्याची तक्रार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कालच राज्यपालांकडे केली होती. शिवसेनेने नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण आज दिवसभर गाजले. त्यानंतर शिवसेनेला एक पाऊल मागे घ्यावे लागल्याचे चित्र निर्माण जाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे पण मारहाण झालेल्या  मनोज शर्मा या अधिकाऱ्याशी बोलले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य शिवसेनेच्या लक्षात आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा शर्मा यांची भेट घेणार असल्याची माध्यमांत चर्चा आहे. भाजपने हा मुद्दा तापवला असून मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेने प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींनी रुग्णालयात जाऊन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी पोलिस सहआयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळतो याचा अर्थ शिवसेनेच्या शाखाप्रमुखावर कारवाईचे नाटक करण्यात आले असून, ठाकरे सरकारची भूमिकाही संशयास्पद आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. राजकीय दबावाखाली पोलिस काम करणार नाहीत व हल्लेखोरांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन सहआयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यंगचित्रावरून ही मारहाण झाली. राज्यात शिवसेनेचे गुंडाराज सुरू झाल्याने लोकांमध्ये भीती आहे, व्यंगचित्रकार राहिलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सैनिकांचा सन्मान केला. मात्र आता सत्तेच्या नादात शिवसेना मूळ भूमिका विसरल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होत आहेत व त्यांनाच मारहाण केली जात आहे. देशासाठी प्राणांची पर्वा न करणाऱ्या सैनिकाला मारहाण झाली, ही बाब शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जवानांची व महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख