विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते सुबोध भावे, तर राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे ?   - Actor Subodh Bhave from Shiv Sena and Rohini Khadse from NCP for the Legislative Council | Politics Marathi News - Sarkarnama

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते सुबोध भावे, तर राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे ?  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

शिवसेनेने समाजसेवा साहित्य कलाक्रीडा या क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे जवळपास ठरवले आहे.

मुंबई : राज्यपालनियुक्त सदस्य हे कला समाजसेवा या क्षेत्रातले असावेत, हा निकष असल्याने राजकीय नेत्यांची नावे पुढे केली जाणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष चार चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. 

कॉंग्रेसची नावे अद्याप मुंबईला मिळालेली नाहीत. दिल्लीतून ही नावे कोणत्याही क्षणी प्राप्त होतील, असे राज्यातले नेते सांगत आहेत. मात्र रात्री उशीरापर्यंत ही नावे येथे पोहोचली नव्हती. युवक कॉंग्रेसला अग्रेसर करणारे सत्यजित तांबे , आक्रमक प्रवक्ते सचिन सावंत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील या नावांबरोबरच मुजफ्फर हुसेन, नसीम खान आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर ही नावे चर्चेत आली आहेत. अर्थात कॉंग्रेसचे शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही असे एका मंत्र्याने सांगितले.
 

सेनेकडून सिंधुताई सपकाळ,  सुबोध भावे?
शिवसेनेने समाजसेवा साहित्य कलाक्रीडा या क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे जवळपास ठरवले आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे यांची नावे निश्चित झाली आहेत. युवासेनेला प्रतिनिधित्व की उध्दव ठाकरे यांची सावली म्हणून वावरणारे मिलिंद नार्वेकर असा तिढा आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या सेनेला सोडण्याच्या काळात सुभाष देसाई, संजय राउत आणि मिलिंद नार्वेकर या तिघांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. त्यातील नार्वेकर यांना अद्याप राजकीय पद मिळाले नाही, मात्र, त्यांचा विचार होणार की त्यांचे महत्व कमी करण्यासाठी युवा सेनेतील नवा चेहरा समोर आणणार यावर ठाकरेंनाच निर्णय घ्यावा लागेल. 

राष्ट्रवादीतही हालचाली महाविकास आघाडीतला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही हालचाली सुरु ठेवल्या आहेत. राज्यपाल निकषात बसणारी नावेच मान्य करतील हे लक्षात घेत एकनाथ खडसे , राजू शेटटी यांची नावे पुढे पाठवायची का याबाबत उच्चस्तरावर खल झाला. खडसे यांची कन्या रोहिणी यांचे सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेता त्यांचे नाव पाठवायचे असेही विचारात आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या जांगावरुन कोणतेही मतभेद नाहीत. कोरोनामुळे निर्णय घेण्यात आला नाही, असही ते म्हणाले
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख