जुही चावलाचा 5G ला विरोध; उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला - Actor Juhi Chawla files suit in Delhi High Court against the implementation of 5G | Politics Marathi News - Sarkarnama

जुही चावलाचा 5G ला विरोध; उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

वृत्तसंस्था
सोमवार, 31 मे 2021

भारतामध्ये सध्या 4G नेटवर्क आहे. पुढील काही वर्षांत 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करण्यात आली.

नवी दिल्ली : अनेक वाद निर्माण झालेल्या 5G नेटवर्कविरोधात अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील काही वर्षांत भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये 5G नेटवर्कची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. पण याविरोधात काही पर्यावरणतज्ज्ञ पुढे आले आहेत. जुही चावला याही पर्यावरणप्रेमी आहेत. (Actor Juhi Chawla files suit in Delhi High Court against the implementation of 5G)

भारतामध्ये सध्या 4G नेटवर्क आहे. पुढील काही वर्षांत 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करण्यात आली. पण याच्या मोबाईल टॅावरमधून बाहेर पडणारे रेडिएशन नागरिकांसाठी असुरक्षित आणि आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा जुही चावला यांनी केला आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विकासाच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारी त्यांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांनी या याचिकेवरील सुनावणीतून स्वत: ला दूर केले. त्यामुळं दुसर्‍या खंडपीठासमोर हे प्रकरण हस्तांतरित करत 2 जून यादिवशी सुनावणी ठेवली आहे. 

हेही वाचा : लस घेऊनही अँटीबॅाडी नाहीत! सिरमच्या अदर पूनावालांविरोधात पोलिसांत तक्रार

आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. वायरलेस कम्युनिकेशनच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या अनेक उत्पादनांचा आम्ही वापर करत आहोत. पण हा वापर करताना त्याचा अतिरेक होऊ नये, याकडेही लक्ष्य देण्याची गरज आहे. आपल्याच संशोधन व अभ्यासातून वायरलेस उत्पादने आणि मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशन घातक असल्याचे म्हटले आहे. 

तसेच 5G तंत्रज्ञान हे नागरिक, पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित आहे, ही ग्वाही संबंधित विभागाने द्यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच याच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी असा अभ्यास झाला नसल्यास सध्याच्या स्थितीत आणि भविष्याचा विचार करून पुरक अभ्यास होण्याची गरज आहे. लहान मुलांचे आरोग्य तसेच भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलांचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

जुही चावला यांनी यापूर्वीही मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशनविरोधा आवाज उठवला आहे. पर्यावरणासाठी काही वर्षांपासून काम करत असून वायरलेस नेटवर्कविरोधात त्यांनी पहिल्यांदाच याचिका दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल या याचिकेवर दोन जून रोजी सुनावणी होणार आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख