अहमदनगर : राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. सध्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्हीही श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठी ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.
श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. सत्तार यांनी विखेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
यावेळी सत्तार म्हणाले, 'राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व आहे. त्यांची राज्याला गरज असून त्यांनी शिवसेनेत यावं.' सत्तार यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पडद्यामागच्या काही राजकीय गणितांवर विखे-सत्तार यांच्यात चर्चा झाली का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे.
विरोधकांना बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याचा दावा#Pune #BJP #Satara #NCP #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/ValCVWBjPB
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 23, 2020
“अब्दुल सत्तार आणि माझी पक्ष विरहीत मैत्री आहे. अनेक वर्षापासुन ते माझे चांगले स्नेही आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही.”, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे. दोघांच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी आज सत्तारांनी विखेंची भेट घेऊन मैत्री शाबूत ठेवली आहे.
लोणी येथील राधाकृष्ण विखेंच्या निवासस्थानी जाऊन सत्तार यांनी विखेंबरोबर स्नेहभोजन केलं. भोजनानंतर विखे-सत्तारांमध्ये गप्पांची मैफल रंगली. भेटीनंतर एका लग्नाला दोघांनीही एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांच्यात बऱ्याचवेळ चर्चा झालेली पाहायला मिळाली. विखे-सत्तार दोघेही वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात खास मैत्री होती. मात्र दरम्यानच्या काळात काही गणिते बदलली आणि सत्तारांनी सेनेचा भगवा हाती धरला तर विखेंनी भाजपचं कमळाचं उपरणं आपल्या गळ्यात बांधलं. दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

