`भाईचंद`च्या आरोपीकडे तहसीलदार, जिल्हाधिकारी यांचे 100 बनावट शिक्के : पोलिसांवर दबाव कोणाचा?

सुमारे ११०० ते १२०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा पोलिसांचा संशय
police1
police1

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील मूळ घोटाळ्यावर आता आणखी नवा घोटाळा रचला असून गुंतवणूकदारांचे हितरक्षणासाठी नेमलेल्या अवसायक जितेंद्र कंडारे याने आरोपींच्या मदतीने सुमारे ११०० ते १२०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यातील एक आरोपी सुनील झंवर याच्या घरात  पोलिसांना तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच अनके वरिष्ठ अधिका-यांचे सुमारे १०० बनावट सरकारी शिक्के सापडले आहेत.

कर्जदारांच्या मालमत्ता संगनमत करून कवडीमोलाने विकण्याचा कारभार अवसायक जितेंद्र कंडारे यांनी केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकारात एक माजी मंत्र्यासह काही आमदारांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकाराच्या मुळापर्यंत जाणार का, अशी शंका आता व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही शंका व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मिडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे की वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे.  असं काय आहे या प्रकरणात  किंवा पोलिसांना असं काय सापडलय धाडीत की अधिकारी आणि राजकारण्यांमध्ये खळबळ उडावी? पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, भाग्यश्री नवटके व सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक हार्डडिस्क आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे अधिकृत २ संकेतस्थळं असताना वेगळे बनावट संक़ेतस्थळ आरोपींनी तयार केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावरून हे प्रकरण केवळ पतसंस्था घोटाळ्याशीच फक्त संबधित नाही तर इतरही अनेक गुन्हे त्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि नीट चौकशी झाली तर फार मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच पोलिसांवर दबाव आणला जात असावा अशी शंका घ्यायला जागा आहे.

सदर प्रकरणी सुजित बाविस्कर, धरम किशोर सांकला, महाविर मानकचंद जैन, विवेक देविदास ठाकरे यांना अटक करण्यात आली असून पोलिस माहेश्वरी, अवसायक जितेंद्र कंदारे,प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनिल झंवर, योगेश साकला आणि इतर काही आरोपींचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरिक्षक सुचेता खोकले या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. 

यात कुंभार यांनी असे म्हटले आहे की हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत एकट्या पुणे शाखेतच १६०० कोटींचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. राजकारणी आणि अधिकारी यांचे काळा पैसा दडवण्याचे केंद्र,कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार, अनेक कायदे आणि नियम यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप या पतसंस्थेवर आहेत. भाई हिराचंद रायसोनी ही मल्टीस्टेट पतसंस्था असल्याने आणि मल्टीस्टेट क्रेडीट को - ऑपरेटिव्ह सोसायटीज् कायदा २००२ प्रमाणे अशा संस्थावर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने  महाराष्ट्र राज्याचे  सहकार आयुक्त या पतसंस्थेवर कारवाई मात्र करू शकत नव्हते त्यामुळं सहकार आयुक्तांनी हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता. 

जळगाव मुख्यालय असलेल्या या पतसंस्थेच्या  महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शारवा आहेत.. बीएचआर अडचणीत आल्यावर संस्थापक प्रमोद रायसोनींसह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या पतसंस्थेचे प्रमोद रायसोनीसह सर्व १३ संचालक आजही कारागृहात आहेत. बेनामी ठेवी व आर्थिक गैरव्यवहारामुळे अडचणीत सापडलेल्या या पतसंस्थेला नंतर दिवाळखोरीत काढण्यात आले. त्यानंतर केंद्रीय सहकार आयुक्तांनी अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती केली होती. कंदारे आणि इतर यांनी सुमारे ११०० ते १२०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. 

पतसंस्थेवर एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर.संस्थेच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या . मात्र त्यांची विक्री करताना त्यातही  घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले. पतसंस्थेवर नेमलेल्या अवसायकाने जप्त केलेल्या मालमता कवडीमोल भावाने विकल्या. अर्थात अवसायकाला राजकारण्यांना आणि विविध अधिका-यांना अंधारात ठेउन ते करता येणे  शक्यच नव्हते. त्यामूळे त्याने किंवा काही अधिकारी आणि राजकारण्यांनी त्याला हाताशी धरून करोडो रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल भावाने ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. ही बँकेच्या भागधारकांची आणि ठेविदारांची फसवणूक आहे. त्यामुळेच या धाडसत्रा नंतर अनेक राजकारण्यांचे आणि अधिका-यांचे धाबे दणाणले असावे.आता हे प्रकरण तडीस जाते की राजकीय साठमारीचा बळी ठरते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल, असे कुंभार यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com