गंगेतील मृतदेहच भाजपला पराभवाकडे ढकलत आहेत..शिवसेनेची टीका -  ShivSena criticizes BJP over dead body in Ganga | Politics Marathi News - Sarkarnama

गंगेतील मृतदेहच भाजपला पराभवाकडे ढकलत आहेत..शिवसेनेची टीका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

निवडणुका जाहीर करणे, लढणे व मोठमोठय़ा सभा, रोड शो करून त्या जिंकणे हे एवढेच काम आता उरले आहे की काय?

मुंबई  : “पश्चिम बंगालचे मिशन अपयशी ठरल्यावर मोदी-शहा व योगी यांनी मिशन उत्तर प्रदेश हातात घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी मोदी-शहा यांनी एकत्रित चिंतन केले. साधारण वर्षभराने उत्तर प्रदेशसह इतर चारेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे भाजपा कामास लागला आहे. प. बंगालातील निवडणुकीत तेथील जनतेने ‘वळकटी’ बांधायला लावली. आता ही वळकटी उत्तर प्रदेशात पसरायची तयारी सुरू झाली आहे. देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. काही शिल्लकच नाही. त्यामुळे फक्त निवडणुका जाहीर करणे, लढणे व मोठमोठय़ा सभा, रोड शो करून त्या जिंकणे हे एवढेच काम आता उरले आहे की काय?,” अशी विचारणा शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.Shiv Sena criticizes BJP over dead body in Ganges

“संसदीय लोकशाहीत निवडणुका अटळ आहेत, पण सध्याचे वातावरण निवडणुकांसाठी योग्य आहे काय?  प. बंगालसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातही वातावरण कोरोनामुळे गढूळ झाले होते. निवडणुका तूर्त स्थगित तरी करा किंवा प. बंगाल, आसामसारख्या राज्यांच्या निवडणुका एका टप्प्यात घ्या, अशी मागणी होत राहिली. मात्र प. बंगालची निवडणूक आठ टप्पे होईपर्यंत लांबवली गेली. त्यामुळे फक्त बंगालच नाही तर देशभरातच कोरोनाचा प्रसार झाला. याबाबत निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावर का लटकवू नये? असा संताप मद्रास हायकोर्टाने व्यक्त केला. आता उत्तर प्रदेशच्या बाबतीतही तीच चूक केंद्र सरकार करीत आहे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.  

हिंदुत्ववाद्यांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयूचा प्रवाह पाहून देशातील हिंदू समाजाचे रक्त तेव्हा उसळले होते. त्यातूनच केंद्रात भाजपची सत्ता आली. पण त्याच गंगेत आज हिंदूंचे मृतदेह बेवारस अवस्थेत तरंगत आहेत. हे मृतदेहच भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांना राजकीय पराभवाकडे ढकलत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मोठा गाजावाजा करूनही भारतीय जनता पक्षाला प. बंगालात विजय मिळवता आला नाही. स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे भाजपचे बंगालातील स्टार प्रचारक होते. हिंदुत्वाच्या नावावर तेथे धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे ‘टुलकिट’ अपयशी ठरले. आता उत्तर प्रदेशातही प. बंगालसारखी गत होऊ नये, म्हणून सगळेच कामाला लागले आहेत. कोरोनाशी लढाई व लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून पुन्हा एकदा निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे अशी खंत शिवसेनेने सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे. “वास्तविक, निवडणुका मागेपुढे झाल्याने काही आकाश कोसळणार नाही. सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडेच देणे गरजेचे आहे. नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल. जगात आपली नाचक्की होईल,” असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात...

  1. गंगेतील पात्रात वाहत आलेल्या मृतदेहांना पुन्हा जिवंत करता येणार नाही. 
  2. मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठीही संघ परिवाराचे स्वयंसेवकही पुढाकार घेताना दिसले नाहीत. 
  3. वाराणसीत तर प्रेते जाळायला स्मशानात रांगाच रांगा लागल्या.  
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख