राष्ट्रवादी काँग्रेस वेळ मारणार की साधणार ?  - Who will win the by election in Solapur Bhagirath Bhalke suitable candidate | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस वेळ मारणार की साधणार ? 

प्रमोद बोडके 
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

भगिरथ भालके खरोखरच योग्य उमेदवार होऊ शकतात का ? याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरु झाली आहे.

सोलापूर : दोन मराठा उमेदवार उभे करुन स्वत: निवडून यायचे ही स्व. सुधाकरपंत परिचारक यांची खेळी कै. भारत भालके यांनी पंढरपूर मंगळवेढ्यात फेल ठरविली. तीन निवडणुकांमध्ये कै. भालकेंनी तीन पक्षांचा पर्याय येथे यशस्वी करुन दाखविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघड असलेला हा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघ कै. भारत भालकेंनी चमत्कारिकरित्या आपल्या ताब्यात ठेवला होता. 'भारत तु कसा निवडून आला'? अशी विचारणा करत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही येथील निकालाचे कोडे पडले होते. 

पक्षापेक्षा व्यक्तीवर चालणाऱ्या या मतदार संघात कै. भालके नाहीत, कै. भालके यांच्याबद्दल असलेली सहानभुती एवढी एकमेव जमेची बाजू सध्या राष्ट्रवादीकडे आहे. ही जमेची बाजू कै. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री यांच्यासाठी वापरुन वेळ मारुन न्यायची ? की या भागाला नवे नेतृत्व देऊन "हीच ती वेळ' साधायची ? असा मोठा प्रश्‍न राष्ट्रवादीपुढे पडला आहे. 

भगिरथ भालके खरोखरच योग्य उमेदवार होऊ शकतात का ? याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरु झाली आहे. कै. आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव विधानसभा मतदार संघातून ज्या पध्दतीने सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादीने राजकारणात पुढे आणले, तोच फॉर्म्युला पंढरपूर - मंगळवेढ्यात अधिक चांगल्या पध्दतीने चालू शकेल का ? याचीही चाचपणी होत आहे. पोटनिवडणुकीत महिला उमेदवार असल्यास जास्त चुरस होणार नाही. 

राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

आमदारकीच्या तीन ते साडेतीन वर्षांसाठी जयश्री भारत भालके यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीला तुर्तास वेळ मारुन नेता येईल. बदलती राजकीय गणिते पाहून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नव्या नेतृत्वाचा शोध घेता येईल असाही एक पर्याय राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर मानला जात आहे. 
राष्ट्रवादीने साम, दाम, दंड भेद या सर्व ताकदीचा वापर करुन सध्या तरी परिचारक कुटुंबाला जवळ करण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादीनेही परिचारक यांच्यासोबत जवळीक वाढवत असतानाच उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भगिरथ भालके यांनी गाव दौऱ्याला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? याचे उत्तर जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तो पर्यंत भाजपच्या गोटात अशीच शांतता राहण्याची शक्‍यता आहे. 

हुकमी एक्का आवताडे 

भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या अवघड असलेल्या पंढरपूर-मंगळवेढ्यात कै. भारत भालके यांनी जसे अचंबित करणारे यश मिळविले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी वाटचाल सुरु केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडेंना येथून 42 हजार तर 2019 मध्ये 55 हजार मते मिळाली आहे. 2019 मध्ये आवताडे यांच्यासमोर कै. भारत भालके व कै. सुधाकरपंत परिचारक यांच्यासारखे दोन दिग्गज होते. 2019 मध्ये आवताडे अपक्ष असतानाही दोन दिग्गज्जांसमोर घेतलेली मते दखलपात्र आहेत. 

कै. भालके यांच्या निधनानंतर "आपला माणूस'ची रिकामी झालेली पोकळी भरुन काढण्याची ताकद आवताडे यांच्यात आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये मागील दोन निवडणुकीत वाढच झाली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्या भुमिकेला अधिक महत्व आले आहे. पोटनिवडणुक असो की सार्वत्रिक निवडणुक, पंढरपूर-मंगळवेढ्याच्या मैदानात समाधान आवताडे आता हुकमी एक्का झाले आहेत हे नक्की.

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख