..म्हणून संजयकाका पाटील मंत्रीमंडळ विस्ताराच्या बातम्या आल्या की अस्वस्थ होतात!

या आधी संजय पाटलांचे केंद्रीय मंत्रीपद थोडक्यात हुकले होते...
Sanjaykaka patil ff 1.jpg
Sanjaykaka patil ff 1.jpg

पुणे : पंतप्रधान मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या बातम्या सध्या झळकत आहेत. महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, कोण पद गमावणार याची चर्चा सुरू आहे. मात्र अशा बातम्या सुरू झाल्या की सांगलीचे खासदार संजयकाका पाटील (MP SanjayKaka Patil) यांना त्यांचा जुना अनुभव नक्कीच आठवत असणार. सध्याच्या विस्ताराच्या वेळीही संजयकाकांचे नाव घेतले जात आहे. पण या चर्चा म्हणजे कसे अळवावरचे पाणी ठरते, याचा अनुभव संजयकाकांनी घेतलेला आहे.

मोदी सरकारच्या 2014 ते 2019 या कालावधीतील पहिल्य टर्ममध्ये संजयकाका पहिल्यांदा खासदार झाले. काॅंग्रेसने या मतदारसंघातून कधीच पराभव पाहिला नव्हता. तेथे वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा पराभव करून संजयकाकांनी भाजपचे कमळ खुलवले. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला चांगला आणि जोरदार चेहरा या निमित्ताने मिळाला. या चेहऱ्याचा योग्य तो राजकीय वापर करण्याचेही नियोजन भाजपने केले. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि पाटील यांचीही गट्टी जमली. त्यामुळे पाटील यांची वाटचाल भाजपमध्ये वेगाने होईल, अशी चर्चा सुरू झाली. आक्रमक मराठा चेहरा म्हणूनही भाजपसाठी ते योग्य ठरत होते.

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममधील विस्ताराची चर्चा 2016 मध्ये सुरू झाली. त्या वेळी संजयकाका पाटील यांचे नाव आघाडीवर होते. फडणवीस यांनी त्यांना तसा विश्वासही दिला होता. मोदींच्या मंत्रीमंडळात शपथ घेण्यासाठी संजयकाकांची तयारीही झाली होती. प्रतिक पाटील यांच्यांनंतर सांगलीतून केंद्रीय मंत्री होणारे संजयकाका हे दुसरे नेते ठरले असते. पण राजकारणात कशा घटना काय घडतील, हे सांगता येत नाही. ऐनवेळी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांची तेव्हा केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली. संजय पाटलांची हातातील संधी गेली. भामरे यांचे मेव्हणे हे गुजरातमध्ये आयएएस अधिकारी आहेत. मोदी हे मुख्यमंत्री असताना भामरेंच्या मेव्हण्यांशी त्यांचा परिचय होता. ते संबंध भामरेंसाठी उपयुक्त ठरले, अशी तेव्हा चर्चा होती. मात्र फडणवीस यांचा पाठिंबा असूनही संजय पाटलांचा समावेश काही झाला नाही. नाराज संजय पाटलांची फडणवीस यांनी कशीबशी समजूत काढली. तसेच नाराजी दूर करण्यासाठी त्यांना लाल दिवा असलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही देण्यात आले.

आताही मंत्रीमंडळ विस्तारासाठी संजयकाकांचे नाव येते आहे. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव सध्या जोरात आहे. ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या नावाविषय अनेक अटकळी लावण्यात येत आहेत.  

याशिवाय नंदुरबारच्या खासदार डाॅ. हिना गावित, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यसभेचे खासदार विनय यांच्याही नावांना पसंती आहे. राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते.

सध्या असलेल्या सहा मंत्र्यांपैकी कुणालाही वगळण्याची शक्यता कमी दिसते. गडकरी-गोयल-जावडेकर-दानवे-आठवले यांचे स्थान निश्चित आहे. जर थोडीफार धाकधूक असेल तर तो संजय धोत्रे यांच्याबाबत आहे. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, असे सांगितले जाते. मात्र मनुष्यबळ आणि माहिती-तंत्रज्ञान-दूरसंचार अशी तगडी खाते असलेल्या आणि उच्चविद्याविभूषित असलेल्या धोत्रे यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आपुलकी दिसते. धोत्रेंना वगळले तर राणेंच्या नावावर प्राधान्याने विचार होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com