पुणे पदवीधरच्या आखाड्यात संभाजी ब्रिगेडचा शड्डू घुमणार? - Three way fight may be witnessed in Pune Graduate Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधरच्या आखाड्यात संभाजी ब्रिगेडचा शड्डू घुमणार?

मतीन शेख
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून अरुण लाड,भाजपचे संग्राम देशमुख तर संभाजी ब्रिगेड संघटनेचे डॉ.श्रीमंत कोकाटे या तिघा उमेदवारांना एकमेकांचे आव्हान पेलावे लागणार आहे.

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून अरुण लाड,भाजपचे संग्राम देशमुख तर संभाजी ब्रिगेड संघटनेचे डॉ.श्रीमंत कोकाटे या तिघा उमेदवारांना एकमेकांचे आव्हान पेलावे लागणार आहे.

गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अरुण लाड यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे फटका बसला होतो.यंदा मात्र अरुण लाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या देशमुख यांच्या आव्हानासह संभाजी ब्रिगेडच्या कोकाटेंचे आव्हान अरुण लाड यांच्या समोर उभे राहिले आहे. प्रत्येक निवडणूकीत राष्ट्रवादीच्या मागे उभी राहणारी संभाजी ब्रिग्रेड या निवडणूकीत मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भुमिका घेतली आहे.पुरोगामी विचारांची तसेच शिवकालीन इतिहासाची मांडणी तरुणांपुढे करत संभाजी ब्रिग्रेडने महाराष्ट्रभर कार्यक्रत्यांचे जाळे विणले आहे.पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संघटनेचा विशेष प्रभाव आहे.संघटनेचे अध्यक्ष प्रविण गायकवाड तसेच इतिहास अभ्यासक व शिव व्याख्याते म्हणुन प्रसिद्ध असणारे श्रीमंत कोकाटे यांनी अलीकडच्या काळात तरुणांचे संघटन उभे केले असल्याने यातील पदवीधर  तरुणांची एक व्होट बँक तयार झाली आहे.राष्ट्रवादीकडे सरकणारा हा पारंपारिक मतदार यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करण्याचे वातावरण निर्माण झाल्याने मत विभाजनाचा फटका अरुण लाड यांना बसू शकतो.

सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची फौज वाढली आहे.या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने यंदाची पदवीधरची उमेदवारी ब्रिगेडला द्यावी अशी मागणी होत होती.लाड आणि देशमुख हे दोघे साखर सम्राट म्हणून ओळखले जातात.सांगली जिल्ह्यात दोघांचे प्रस्थ असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील तसेच रयत,विवेकानंद या मोठ्ठ्या शिक्षण संस्थातील बराच तरुण पदवीधर मतदार संभाजी ब्रिगेडशी जोडला गेलेला आहे.याचा फायदा श्रीमंत कोकाटेंच्या उमेदवारीला होऊ शकतो.तसेच राष्ट्रवादीच्या मतांच्या ध्रुवीकरण भाजपचे उमेदवार देशमुख यांच्या पथ्यावर पडू शकते.

शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष...

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड हे राष्ट्रवाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीये मानले जातात.अनेक निवडणुकीत ब्रिगेडच्या माध्यमातून राष्ट्रवादीला बळ पुरवण्याचे काम गायकवाड यांनी केले आहे.परंतु या निवडणूकीत गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात थेट भुमिका घेतली आहे.कोकाटे यांच्या प्रचार सभेसाठी गायकवाड विविध दौरे करत आहेत.कोकाटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार ब्रिगेडची उमेदवारी मागे घ्यायला लावतील असा अंदाज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होता परंतू तसे न झाल्याने पडद्यामागे शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख