...अन् म्हणून दत्तामामांनी बोलणे टाळले  - Solapur District Guardian Minister Dattatreya Bharane held a review meeting | Politics Marathi News - Sarkarnama

...अन् म्हणून दत्तामामांनी बोलणे टाळले 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

ते आले, त्यांनी पाहिले आणि ते गेले असेच त्यांच्या दौऱ्याचे वर्णन करता येईल.  

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढवण्याच्या कामासाठी फिरत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर भरणे यांनी अखेर रविवारी सोलापुरात हजेरी लावली.

यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनासोबत तातडीची बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या. यामध्ये ऑक्सिजचा तुटवडा, रेमडेसिव्हिरची कमतरता तसेच विविध गोष्टींचा आढावा घेत प्रशासनाला सुचनाही केल्या. मात्र बैठकीनंतर त्यांनी आचारसंहितेचे कारण देत माध्यमांशी बोलणे टाळले.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' कुणाचा?
 

तसेच आजच निवडणूक आयोगाला पत्र देऊन सोलापूर जिल्ह्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतले. आचारसंहिता शिथील झाल्यानंतर मी आपल्याशी संवाद साधतो असे ते म्हणाले. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्या फोल ठरल्याचे पाहायला मिळाले. ते आले, त्यांनी पाहिले आणि ते गेले असेच त्यांच्या दौऱ्याचे वर्णन करता येईल.  

चिवटे काय म्हणाले होते? 

भरणे यांचे जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोरोनाच्या काळात ते निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना त्यांचे जिल्ह्यात कुठेही लक्ष नाही, त्यांचा शासकीय अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी कसलाही संपर्क नाही, अशा मंत्र्यांकडे सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्रीची जबाबदारी काढून घेऊन ती दुसऱ्या एका सक्षम मंत्र्यांकडे द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे असे त्यांनी सांगितले होते. 

बाळासाहेब थोरोत यांच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याकर्यांचा गोंधळ

करमाळा तालुक्यात सध्या फक्त ३५ बेड उपलब्ध असून या ठिकाणी राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेला नाही. रेमडेसिव्हिर औषधाअभावी रुग्णांचे प्राण जात आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क करून औषधांची मागणी केली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नेमलेल्या कमिटीचे सदस्य फोनही उचलत नाही.

लॉकडाऊनची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे सत्तेचे पांघरून घेतलेले पालकमंत्री मात्र आपल्या कर्तव्याला विसरत आहेत, असा आरोपही चिवटे यांनी पत्रात केला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख