मराठा समाजाने ताकद दाखवलीय; आता लोकप्रतिनिधींनी आरक्षण कसे देणार, हे सांगावे - Silent agitation for Maratha reservation in Kolhapur on 16th June: Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजाने ताकद दाखवलीय; आता लोकप्रतिनिधींनी आरक्षण कसे देणार, हे सांगावे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

एका बाजूला मी, महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी अशी ती बैठक व्यवस्था असेल.

कोल्हापूर : मराठा समाजाने जी ताकद दाखवायची होती, ती दाखवली आहे. समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरवून वेठीस धरणे योग्य नाही. ज्या लोकप्रतिनिधींना समाजाने मतदान देऊन निवडून दिले. आता त्यांची जबाबदारी आहे. त्या लोकप्रतिनिधींनी (आमदार, खासदार, मंत्री) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणे महत्वाचे आहे. मराठा समाजाला राजकीय पक्षांच्या वादात कसलेही स्वारस्य नाही. आजही लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोण म्हणतं आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे, तर कोण म्हणतं राज्याची. पण, आम्ही म्हणतोय ही जबाबदारी केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांची आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका जाहीर करावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. (Silent agitation for Maratha reservation in Kolhapur on 16th June: Sambhaji Raje)

सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची कोल्हापूर बैठक झाली. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते. येत्या १६ जूनला दहा ते एक या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मूक आंदोलन होणार आहे. आंदोलनात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, २१८५ विद्यार्थी असणार आहेत. त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधींनी येऊन आपली भूमिका मांडावी, असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

हेही वाचा : अविश्वास ठरावाच्या राजकारणास नाट्यमय कलाटणी : पोखरकरांची मोहितेंवर तात्पुरती मात 

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. त्यादिवसापासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आज समाज नाराज आहे, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. त्यांना वास्तव परिस्थितीची जाणीव करून देणे, माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आता आंदोलनाची दिशा ठरवली आहे. आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालकमंत्री सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. एका बाजूला मी, महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी अशी ती बैठक व्यवस्था असेल. त्या ठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्या जागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी. 

प्रत्येक जिल्ह्यांत जाऊन आम्ही हे मूक आंदोलन करणार आहोत. समाज शांत असेल म्हणजेच मूकपणे ऐकणार आणि आमदार, खासदार, मंत्री फक्त बोलणार. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदार, खासदार, मंत्री यांनी समाजाच्या समोर समाजाच्या साक्षीने बोलले पाहिजे. ‘समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी निश्चित करा’, अशी या आंदोलनाची tag line आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणून आम्ही या आंदोलनाला मूक आंदोलन हे नाव दिले आहे. या आंदोलनातून जनतेला कळून जाईल की आपला निवडून दिलेला लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे. ते समाजासाठी इथून पुढे काय करणार आहे, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींपुढे आव्हान उभे केले आहे.

दरम्यान, तत्पूर्वी येत्या 12 जून रोजी दुपारी मी कोपर्डी (जि. नगर) येथे भेट देणार आहे. पुणे येथून सर्व समन्वयक, माझ्यासोबत तिकडे येणार आहेत. तिथून पुढे काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळास भेट देणार आहे, असेही संभाजीराजे यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख