महाराष्ट्रातून शिवसैनिकांचा कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न - Shivsena Workers tried to barge in Karnataka Border | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रातून शिवसैनिकांचा कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न

अनिल पाटील
सोमवार, 8 मार्च 2021

बेळगाव महानगरपालिकेवर लाल पिवळा झेंडा फडकविण्यात आला आहे. तो झेंडा काढून भगवा झेंडा लावण्यात यावा, महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांना कर्नाटकात घातलेली बंदी निंदनीय आहे. त्यामुळे शिवसैनिक कर्नाटकात प्रवेश करणारच, या उद्देशाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सोमवारी (ता. ८) येथील दुधगंगा नदीजवळ असणाऱ्या कर्नाटक हद्दीत जाण्याचा जोरदार प्रयत्न केला.

कोगनोळी : बेळगाव महानगरपालिकेवर लाल पिवळा झेंडा फडकविण्यात आला आहे. तो झेंडा काढून भगवा झेंडा लावण्यात यावा, महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांना कर्नाटकात घातलेली बंदी निंदनीय आहे. त्यामुळे शिवसैनिक कर्नाटकात प्रवेश करणारच, या उद्देशाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सोमवारी (ता. ८) येथील दुधगंगा नदीजवळ असणाऱ्या कर्नाटक हद्दीत जाण्याचा जोरदार प्रयत्न केला.

मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन परत महाराष्ट्रात नेले. या वेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, 'कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी केली आहे. ही निंदनीय गोष्ट असून कर्नाटक शासनाचा आपण निषेध करत आहोत. बेळगाव महानगरपालिकेवर फडकवण्यात आलेला लाल पिवळा झेंडा उतरून त्याजागी भगवा झेंडा फडकविण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. शासनाने केलेल्या बंदीचा निषेध करून आम्ही कर्नाटकात प्रवेश करणार आहोत.'

सकाळी नऊ वाजता कागल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिक जमले. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी मोटार सायकल रॅली काढून ते दूधगंगा नदीवर आले.या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी अडविले. यावेळी कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,' 'बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', यासह अन्य घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी कर्नाटक शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेश बंदीचा देण्यात आलेल्या आदेशाची होळी करण्यात आली. यानंतर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या या शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख सुजित चव्हाण, विभाग प्रमुख वैभव अडके,  कागल तालुका प्रमुख शिवगोंडा पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

यावेळी निपाणी मंडल पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, एएसआय एस. ए. टोलगी, पी. एम. घस्ती, अमर चंदनशिव यांच्यासह कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, एपीआय दीपक वाकचौरे, निरीक्षक सुशांत चव्हाण, निखिल कर्चे,  उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांच्यासह शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख