राणेंच्या जनता दरबारावर शिवसेनेची टिका : पोकळ घोषणांना जनता कंटाळली  - Shiv Sena's criticism on Narayan Rane's Janata Darbar: People are fed up with hollow announcements | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

राणेंच्या जनता दरबारावर शिवसेनेची टिका : पोकळ घोषणांना जनता कंटाळली 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यातील सत्तास्थाने हातून निसटत असल्याचे लक्षात आल्यावर शेवटचा उपाय म्हणून राणे यांची धडपड सुरू आहे.

देवगड : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या जनता दरबारावर शिवसेना जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर यांनी टीका केली. राणे यांनी घेतलेल्या जनता दरबाराचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनता दरबार घेण्याचे त्यांना कधी सुचले नाही आणि आता दिखावा कशासाठी? असा सवाल साळसकर यांनी विचारला आहे. 

राणे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्याअनुषंगाने साळसकर यांनी टीकास्त्र सोडले. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील जनता नारायण राणे यांच्या पोकळ घोषणांना कंटाळली आहे. जनता लांब जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जनता संवाद कार्यक्रम घेतला. आमदार नीतेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना नारायण राणे यांना जनता दरबार घ्यावा लागणे, ही नामुष्कीच आहे. 

आमदार राणेंना मतदार संघातील जनतेचे प्रश्‍न समजत नाहीत की जनता त्यांना स्वीकारत नाही; म्हणून नारायण राणे यांना धावपळ करावी लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडवले जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नांतून जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होत आहे. त्यामुळे नारायण राणेंनी कितीही धावाधाव केली, जनतेप्रती कळवळा दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा काहीही उपयोग नाही, असे साळसकर यांनी म्हटले आहे. 
ते म्हणाले की, जिल्ह्याचे अनेक वर्षे नेतृत्व केलेल्या नेत्याला जनतेच्या जवळ जाण्यासाठी अशी धावाधाव करावी लागणे, दुर्दैवी आहे. जनतेचे प्रश्न समजण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये जायचे असते. त्यांच्याशी आपुलकीने, प्रेमाने संवाद साधून लोकप्रतिनिधींविषयी विश्वासाहर्ता निर्माण करुन जबाबदारी पार पाडायची असते. यामध्ये आमदार राणे कमी पडल्याने नारायण राणे यांना धावाधाव करावी लागते. यातून काहीही साध्य होणार नाही. 

"गेली सुमारे 25 वर्षे प्रश्‍न सोडविता आलेले नाहीत, त्यांनी आता जनतेचे प्रश्न समजून घेवून काय करणार, हे जिल्हावासियांना माहिती आहे. जिल्ह्यातील सत्तास्थाने हातून निसटत असल्याचे लक्षात आल्यावर शेवटचा उपाय म्हणून राणे यांची धडपड सुरू आहे,' असा टोला साळसकर यांनी लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख