आता कॉंग्रेसने फोडला कोकणातील शिवसेनेचा नेता  - Shiv Sena leader from Konkan to join Congress party | Politics Marathi News - Sarkarnama

आता कॉंग्रेसने फोडला कोकणातील शिवसेनेचा नेता 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

पारनेरमधील पाच नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्यानंतर शिवसेनेने तो विषय प्रतिष्ठेचा केला होता.

सावंतवाडी : पारनेर प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना नेत्यांना पक्षप्रवेश देण्याचे कटाक्षाने पाळले आहे. मात्र, आता कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेतील एक नेता फोडला आहे. येत्या काही दिवसांत त्या नेत्याचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. पारनेरमधील पाच नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्यानंतर शिवसेनेने तो विषय प्रतिष्ठेचा केला होता. आता कॉंग्रेसच्या या पक्षप्रवेशावर शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे. 

कुडाळ येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट हे पुन्हा कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांचा कॉंग्रेसमधील प्रवेश जवळपास निश्‍चित झाला असून त्यांनी खुद्द या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

अभय शिरसाट यांनी आज (ता. 23 नोव्हेंबर) मंत्रालय येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राहुल गांधी यांचे अत्यंत विश्‍वासू खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन प्रवेशासंदर्भात चर्चा केली आहे. 

या वेळी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, उपाध्यक्ष विजय प्रभू, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर उपस्थित होते. 

अभय शिरसाट हे यापूर्वी कॉंग्रेसमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी फार चांगले काम केले होते; परंतु नारायण राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना उपजिल्हाप्रमुख पद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 

शिवसेना नेत्यांच्या कार्यपद्धतीला अभय शिरसाट कंटाळले होते, असे सांगितले जाते. त्यामुळे ते कॉंग्रेस पक्षाच्या गळाला लागल्याचे सांगितले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख