शाहू महाराजांना आवडली नव्हती संभाजीराजेंची ती नियुक्ती  - Shahu Maharaj did not like that appointment of Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

शाहू महाराजांना आवडली नव्हती संभाजीराजेंची ती नियुक्ती 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

वडिलांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मला फार कष्ट करावे लागतात. त्यांची आम्हाला आजही आदरयुक्त भीती वाटते.

पुणे : "माझी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाली. ती नियुक्ती भारतीय जनता पक्षाकडून म्हणण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झाली होती. पण, ती गोष्ट माझे वडिल म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना आवडली नव्हती. त्यांनी ते मला स्पष्टपणे बोलून दाखवले होते की "मला ही नियुक्ती आवडली नाही,' असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. 

खासदार संभाजीराजे हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी आपल्या खासगी आयुष्याचा पटही उलगडून दाखविला. 

"छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीवर नाराजी व्यक्ती केली, त्यावेळी मीही त्यांचे म्हणणे मान्य केले. पण, मी त्यांना सांगितले की, मला जनतेची सेवा करण्याची मिळालेली ही संधी आहे. त्या संधीचे मला सोने करायचे आहे.

राष्ट्रपती कोट्यातून मला सन्मानपूर्वक खासदारकी मिळाली आहे. खासदारकीच्या आतापर्यंतच्या काळात मी चांगले काम केले आहे, असे मला वाटते. उर्वरित काळातही आणखी चांगले काम करत राहीन,' असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

संभाजीराजेंना थेट शाबासकीची प्रतीक्षा 

छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या कामाचा आनंद वाटतो? या प्रश्‍नावर संभाजीराजे म्हणाले की वडिलांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मला फार कष्ट करावे लागतात. त्यांची आम्हाला आजही आदरयुक्त भीती वाटते. आजही ते इतर व्यक्तींच्या माध्यमातून आमच्या चुकीबद्दल सांगत असतात. चांगल्या कामाची इनडायरेक्‍ट शाबासकी मिळते, जसे की मी जेव्हा रायगडावर राज्याभिषेक सोहळा सुरू केला. त्या वेळी त्यांनी "छान आहे, छान आहे,' अशी इतरांच्या माध्यमातून शाबासकी दिली होती. पण, मी आजही त्यांच्या डायरेक्‍ट शाबासकीची वाट पाहत आहे, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी बोलून दाखवली. 

चुकीच्या वागण्याबद्दल फटकेही बसले आहेत 

लोकशाहीत राजघराण्यांना किती महत्त्व असावं? याबाबत खासदार म्हणाले की राजघराण्याचा ऍडव्हान्टेज मिळतोच. पण, लोकशाहीत कामाला महत्त्व आहे. तुम्ही लोकांना वेळ देत, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज असते. आमचा जन्म राजघराण्यात झाला असला तरी चुकीच्या वागण्याबद्दल आम्हालाही फटके बसले आहेत. परंतु, मी माझ्या मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने वागतो, असे त्यांनी सांगितले. 

...म्हणून मोदींनी आम्हाला भेटीची वेळ दिली नाही. 

महाराष्ट्रातील सर्व खासदारांना मी आवाहन केले होते की, मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात आपण सर्वजण मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू. त्यावर शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप या सर्व पक्षाच्या खासदारांनी तशी तयारीही दाखवली होती. त्यानुसार आम्ही मोदी यांना भेटीची वेळ मागितली होती. परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांनी आम्हा सर्वांना भेटीची वेळ दिली नाही. मी एकटा पंतप्रधानांना भेटू शकलो असतो. परंतु हा प्रश्‍न मला सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधानांपुढे मांडायचा आहे. पंतप्रधानांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी, असा आजही माझा आग्रह आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख