सेनेचे आमदार आबिटकरांनी असे, काय केले की तीनही पक्ष पराभूत झाले - Sena MLA Abitkar said that all three parties were defeated | Politics Marathi News - Sarkarnama

सेनेचे आमदार आबिटकरांनी असे, काय केले की तीनही पक्ष पराभूत झाले

सुनील पाटील 
सोमवार, 18 जानेवारी 2021

भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आपला झेंडा फडकवला आहे.

कोल्हापूर : भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आपला झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या पॅनेलाला विरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने धुरळा उडाला होता. गट-तट व सहकार समूहाच्यामाध्यमातून निवडणूका लढवल्या गेल्या. दरम्यान, काही ग्रामपंचायती पक्षीय पातळीवर लढल्या गेल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेनेला टक्कर देण्याचा निर्णय घेतला.

एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना खानापूरमध्ये मात्र, शिवसेना विरुध्द भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे चित्र होते. दरम्यान, आमदार आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पॅनेल सक्षमपणे लढले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गावात त्यांना पराभव पत्करावा लागल्याने राज्यात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

शिवेसना विरुध्द इतर पक्ष अशी ही लढत होत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीचे लक्ष लागले होते. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे हा विजय त्यांना सहजसोपा असेल अशीही चर्चा होती. मात्र, शिवसेनेने या तिन्ही पक्षांना धुळ चारत आपला विजय निश्‍चित केला. 

शिवसेनेला शह देण्यासाठी स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र, तरीही शिवसेने 6 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणली आहे. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती.

खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. सत्ता खेचून आणण्यासाठी आबिटकरांनी कंबर कसली होती. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी रंगतदार निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, प्रकाश आबिटकरांनी खानापूरमध्ये विजय मिळवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास गिफ्ट दिलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख