मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी  देणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक अखेर अटकेत 

एक आठवड्यापूर्वी मुख्याधिकारी यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडेराव जाधवहा पसार झाला होता. त्याचा इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर तो उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती होती
Sangli Islampur NCP Corporator Khanderao Jadhav Arrested By Police
Sangli Islampur NCP Corporator Khanderao Jadhav Arrested By Police

सांगली/इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार  त्यांच्या केबिनमध्ये जाऊन जीवे मारण्याची धमकी देणारा राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याला इस्लामपूर पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. त्यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी वगळता इतर सर्वपक्षीय स्तरातून दबाव वाढत चालला होता. आज अटकेनंतर त्याला येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

एक आठवड्यापूर्वी मुख्याधिकारी यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडेराव हा पसार झाला होता. त्याचा इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर तो उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती होती. दरम्यान त्यापूर्वीच इस्लामपूर पोलिसांनी आज पहाटे त्याला अटक केली. 

मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना मारण्याचा प्रयत्न व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात आठवड्यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या बियर बारमधून कचरागाडीतून दारूची वाहतूक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांवर व वाहनांवर मुख्याधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर जाधव याने मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्यावर केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर कारवाई करू नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची पवार यांची तक्रार आहे. 

चार दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी लेखी तक्रार नोंदवली होती. त्यात जाधव याने जीव मारण्याची धमकी दिली. या शिवाय खुर्ची घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले होते. जाधव याच्यावर यापूर्वीही मारामारी, खुनाचा प्रयत्न यासह इतर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनाही त्याने धमकी दिली होती. 
नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात पसार झालेल्या खंडेरावला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

चंद्रहार पाटीलही अद्याप फरारच

ही घटना घडून आठवडा लोटला आणि न्यायालयाने जामीन फेटाळला तरी जाधव पोलिसांना सापडत नव्हता. याबाबत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली होती. याच प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे आणिखी एक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने देखील विटा तहसिलदारांवर हल्ला केला होता. तो देखील फरारच आहे. हे दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याने व गृहखाते याच पक्षाकडे असल्याने पोलिस कारावाईस कचरत असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. 

दरम्यान यापैकी आता एका नगरसेवकला तरी पोलिसांनी अटक करून आपल्यावर दबाव नसल्याचे कृतीतून दाखवले आहे. या दोन्ही घटनानंतर जिल्ह्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी राजकीय गुंडांना आवरा अशी मागणी करत निषेध नोंदविला होता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील आम्ही याची गंभीरपणे दखल घेतल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तसेच जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी राजकीय दबाव नाही, पथके संबंधितांच्या मागावर आहेत कठोर कारवाई करणारच असे स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com