रत्नागिरीत महाविकास आघाडीसाठी उदय सामंत शरद पवार यांना भेटणार - Ratnagiri Shivsena MLA Uday Samant To Meet NCP Sharad Pawar for Alliance | Politics Marathi News - Sarkarnama

रत्नागिरीत महाविकास आघाडीसाठी उदय सामंत शरद पवार यांना भेटणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सांगितले आहे

रत्नागिरी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याचप्रमाणे पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचा पाठिंबा मिळावा, यासाठी वरिष्ठ पातळीवर आपण चर्चा करीत आहोत. स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहोत. महाविकास आघाडी झाली तर उत्तम नाहीतर शिवसेना स्वबळावर लढायला तयार आहे, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यानी केले.

एकूण मतदानाच्या सत्तर टक्के इतक्‍या विक्रमी मतांनी काहीही झाले तरी शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्‍वासही सामंत यांनी व्यक्‍त केला. शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी बंड्या साळवी यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर सामंत पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ''प्रभारी नगराध्यक्ष म्हणून साळवी यांनी गेले सहा महिने अनेक चांगले निर्णय घेतले. यापूर्वी सुरू असलेल्या कामांनाही न्याय देताना ती कामे वेगाने कशी होतील, याकडेही त्यांनी लक्ष पुरवले आहे. शहरासाठी नव्याने नळपाणी योजनेच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. सुमारे 63 कोटी रुपयांची नळपाणी योजना पूर्ण होण्यास चार महिने लागतील. परंतु पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यत ही पाइपलाइन तीस ते चाळीस दिवसात येऊन त्याद्वारे पाणी पुरवठा केंद्रापर्यंत सुरू केला जाणार आहे.''

''शहरातील डांबरीकरणाची कामे नळपाणी योजनेमुळे थांबली आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नळपाणी योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरणाची कामे करण्यात यावीत, असे आदेश दिले होते. त्यामुळे शहराच्या रस्त्यांची कामे थांबली. आपण हे आदेश बदलावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार आहोत. त्यामुळे शहरातील डांबरीकरणाची कामे मेपर्यंत पूर्ण होतील." असेही सामंत म्हणाले.

शरद पवार यांनाही भेटणार

राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणेच रत्नागिरीत पोटनिवडणुकीत आघाडी व्हावी, यासाठी आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते अजित पवार व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आपण भेटणार आहोत, असे सामंत यांनी सांगितले.

बाहेरच्या व्यक्‍तींचा रत्नागिरीकरांवर प्रभाव नाही

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शहराच्या विकासाबाबत काय म्हटले, त्यापेक्षा रत्नागिरीकरांचा विश्‍वास बाहेरुन आलेल्या व्यक्‍तीवर नसून, स्थानिकांवर आहे. खासदारकीच्या निवडणुकीत हे दिसून आले आहे. ही निवडणूक लादलेली नाही, असा दावा सामंत यानी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख