राजू शेट्टी; सहकारमंत्र्यांच्या भूमिकेवर  ऊसदर आंदोलन अवलंबून - Next Agitation about Sugarcane Price will be at Karad | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टी; सहकारमंत्र्यांच्या भूमिकेवर  ऊसदर आंदोलन अवलंबून

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

ऊसदरासह इतर प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी ता. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवनात बैठक घेतली आहे. बैठकीत एफआरपी व इतर मुद्‌द्‌यांवर तोडगा न निघाल्यास त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहणार आहे. आंदोलनाची तीव्रता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.

सातारा  : ऊसदरासह इतर प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी ता. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवनात बैठक घेतली आहे. बैठकीत एफआरपी व इतर मुद्‌द्‌यांवर तोडगा न निघाल्यास त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहणार आहे. आंदोलनाची तीव्रता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. आंदोलन टाळायचे असेल, तर मंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याचे आदेश देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा ते कऱ्हाड पायी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हे आंदोलन जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून शेट्टी यांनी स्थगित केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, "कोरोना व इतर कारणांमुळे यंदाच्या ऊस परिषदेत आम्ही सबुरीचे धोरण घेतले. परिषदेनंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांची एफआरपी जाहीर केली. दोन जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी जाहीर केली. मात्र, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी त्याबाबत गप्प आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील फक्‍त एकाच कारखान्याने एफआरपी जाहीर केली आहे. सहकारमंत्री जिल्ह्यातील आहेत. त्यांनी पुढाकार घेत कारखान्यांना तसे आदेश देणे आवश्‍यक होते. मात्र, ते सुद्धा गप्प आहेत,''

"आजचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती करतानाच त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ता. ५ डिसेंबर रोजी बैठक आयोजिल्याचे लेखी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास त्यानंतरच्या आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहणार असून, आंदोलनास बाळासाहेब पाटील हे जबाबदार राहतील.'' असा इशारा शेट्टी यांनी दिला. कऱ्हाड येथे ता. २५ रोजी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी मोठे नेते येतात. त्यांना भेट देऊन मागण्यांचे निवेदन देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगली, कोल्हापूरकरांचा सहभाग
बैठकीत तोडगा न निघाल्यास कऱ्हाड येथे आंदोलन करण्याचा इशारा देत असतानाच शेट्टी यांनी तोड व इतर कामांत साताऱ्यातील शेतकरी गुंतून पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे या आंदोलनात सांगली आणि कोल्हापुरातील शेतकरी सहभागी होतील. सीमा भागात असणारे हे शेतकरी साताऱ्यातील बांधवाच्या हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलन तडीला नेतील, असा विश्‍वासही शेट्टी यांनी या वेळी व्यक्‍त केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख