राष्ट्रवादीवर नाराज असलेला कोकणातील नेता शिवसेनेत जाणार?  - NCP leader from Konkan to join Shiv Sena? | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीवर नाराज असलेला कोकणातील नेता शिवसेनेत जाणार? 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली होती.

चिपळूण ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मानसन्मान मिळत नसल्याने पक्षाचे अल्पसंख्याक समाजाचे नेते मुबीन खोत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीला रामराम करून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

मुबीन खोत यांचे भाऊ उद्योजक नासीर खोत हे शिवसेनेत सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मुबीन खोत यांनीही शिवसेनेचे काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. 

भावाच्या प्रयत्नांनंतरही मुबीन खोत यांनी चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली होती. मुस्लिमसह इतर समाजातील मते शेखर निकम यांना मिळावेत, यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय कार्यक्रमात कोणी विश्‍वासात घेत नाही. कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठीही प्रयत्न होत नसल्यामुळे खोत यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत माहिती घेण्यासाठी मुबीन खोत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोत यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार योगेश कदम यांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा केली. त्यानंतर सोशल मीडियावर खोत यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी सांगितले की मुबीन खोत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आहेत. त्यांच्यामागे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम समाजातही त्यांची प्रतिमा चांगली आहे. पक्षात त्यांना डावलण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यांची भेट घेऊन लवकरच त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. 

युवा सेनेचे चिपळूणचे तालुकाधिकारी उमेश खताते म्हणाले की, मुबीन खोत यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. मात्र, ते शिवसेनेत आले, तर चिपळूण तालुक्‍यातील युवा सेनेला अधिकचे बळ मिळेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख