चंद्रकांतदादा महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढविणे कुठला पुरुषार्थ?.. - NCP Leader Jayant Patil Taunts Chandrakant Patil of BJP | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादा महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढविणे कुठला पुरुषार्थ?..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडीचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला

सांगली : महाविकास आघाडीचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. आयत्या बीळावर नागोबा होत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टीका करणे बंद करावे, असा टोला पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याचे गुन्हेगारांशी संबंध आहेत. तसेच राज्यात लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे सरकार आहे, अशी टीका पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "त्यांना आपला पक्ष कसा टिकवायचा हा प्रश्न पडला आहे. पुण्यात अतिशय चांगले काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेऊन निवडणूक लढवली, हा काय पुरुषार्थ आहे का? मेधा कुलकर्णींनी मतदारसंघ जीवापाड जपला. त्यांनी अधिकाराचा वापर करुन पुण्यात जाऊन निवडणूक लढवली. एका महिलेने जो मतदारसंघ वाढवला. आयत्या बीळावर नागोबा ही त्यांची पद्धत आहे. त्यांनी पवारांची मापे काढणे बंद करावे,";

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीतील शिवसेनेशी संबंधित एका राज्यमंत्र्याचे नांव घेतले जात आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, "मागच्या दोन घटनांमध्ये आरोप झाले होते. त्यावेळी लक्षात आले की ते आरोप तथ्यहीन होते. आता या प्रकरणाचाही खरेखोटेपणा निश्चित तपासला जाईल." मंत्री व्हायला अक्कल लागत नाही असे माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले होते. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, "त्याचा मला गरीबाला का खुलासा करायला लावता," असा मिस्किल प्रश्न जयंत पाटील यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ''भाजप किती खालच्या स्तरावर गेला आहे हे यावरुन लक्षात येते. भाजप किती खालच्या स्तरावर जाऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे पडळकरांची विधाने आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा वापर करायचा, असे भाजपचे धोरण आहे. भाजप कोणत्या स्तराला गेला आहे हे या निमित्ताने महाराष्ट्राला कळले आहे,''
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख