गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचे ज्ञान कमी  ः जयंत पाटील

हा विषय मीच काढला होता.
Lack of knowledge of Gopichand Padalkar, Sadabhau Khot : Jayant Patil
Lack of knowledge of Gopichand Padalkar, Sadabhau Khot : Jayant Patil

सांगली :आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांचे ज्ञान कमी आहे. त्यांनी कारवाईची माहिती घ्यावी. जास्तीचे बिल आकारणी केलेल्या रुग्णालयाकडून ती रक्कम आम्ही तेव्हाच संबंधित कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना परत केलेली आहे. आजच्या बैठकीतही हा विषय मीच काढला होता. यावर्षी रुग्णालयांचे काटेकोर ऑडिट केले जाईल, असे सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आमदार, खासदारांसोबत कोरोना संकटातील नियोजनाबाबत चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी कोरोना उपचारांसाठी लुटमार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई का होत नाही, असा सवाल आमदार पडळकर, आमदार खोत यांनी केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर जयंत पाटील यांनी वरील भाषेत उत्तर दिले. 

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते. ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांसह राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनबाबत येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय होईल. तोवर व्यापाऱ्यांनी धीर धरावा. व्यापारी पेठा उघडण्याची घाई करू नये, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी या वेळी केले. 

जयंत पाटील म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. दोन आठवड्यांत आपण आरोग्यविषयक सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या 3 हजार 160 बेड उपलब्ध आहेत. त्यात आयसीयूचे 600 आणि ऑक्‍सिजनचे 1 हजार 977 बेड आहेत. 54 ठिकाणी उपचारांची सोय करण्यात आली आहे. ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, असे प्रयत्न आहेत. छोटे 625, जंबो 1117 आणि एकदम मोठे 61 ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध केले आहेत. रेमडेसिव्हिरची किंमत 1 हजार 400 रुपयांवर आली आहे. शासकीय रुग्णालयात मोफतच इंजेक्‍शन दिले जात आहे. त्यामुळे काही अडचण नाही. कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याचे काही प्रकार समोर आल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेत हेल्पलाईन सुरू आहे. या सगळ्या घडामोडींची माहिती रोजच्या रोज लोकप्रतिनिधींना दिली जाईल.’’

लसीकरण थांबू नये यासाठी आमचे प्रयत्न

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला 17 लाख 50 हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 83 हजार लस देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात तपासण्या वाढल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्याही अधिक आहे. केंद्र सरकारने राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार लस उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महाराष्ट्रात वेगाने लसीकरण सुरू आहे. ते थांबू नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com