जयंत पाटलांचा फोडाफोडीचा कार्यक्रम जोरात : भाजपसोबत काँग्रेसनेही घेतला धसका

पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांना गळ टाकून ठेवला आहे.
Jayant Patil's efforts to increase NCP in Sangli
Jayant Patil's efforts to increase NCP in Sangli

सांगली : सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी झपाटा लावला आहे. त्यांनी इतर पक्षांतील जिल्ह्यातील दुसरी फळी आपलेशी करायला सुरवात केली आहे. पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांना गळ टाकून ठेवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रमुख सत्ताकेंद्रे आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा त्यांचा मानस दिसतो. त्यामुळे विरोधी भारतीय जनता पक्षासह सहकारी काँग्रेसमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Jayant Patil's efforts to increase NCP in Sangli)

राज्यातील सत्ता, पालकमंत्रिपद आणि राष्ट्रवादीची प्रदेशाची संघटनात्मक प्रमुख जबाबदारी या प्रमुख पदांच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विस्ताराचे आक्रमक धोरण राबवले आहे. पलूस तालुक्यातील अरुण लाड यांना विधान परिषदेचे आमदार करून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी इथे काँग्रेसच्या ओंजळीने पाणी प्यायचे नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या गटालाही ते धक्का देत आहेत आणि भाजपच्या देशमुखांची फळीही कापत आहेत. 

बाबरांशी असलेले अंतर कमी करण्याचा प्रयत्न

आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांच्यासाठी जयंतरावांनी गळ टाकला आहे. तेथील स्वाभिमानी गटाचे भारत पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने खानापुरात विधानसभा लढवायला सक्षम उमेदवार तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी आता पक्षाची गावपातळीवर बांधणी करायला महत्व दिली आहे. राष्ट्रवादीबरोबर सदाभाऊ पाटील असताना शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना पक्षात येण्याची ऑफर देऊन त्यांनी जयंतनीतीची चुणूक पुन्हा त्यांनी दाखवून दिली आहे. आमदार बाबर हे राष्ट्रवादीत येण्याची शक्यता कमी आहे. मात्र ते मूळचे आर.आर.आबा गटाचे असल्याने जयंतरावांशी अंतर राखून होते, ते अंतर कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

मदन पाटील गटाला सुरुंग : विशाल पाटील अस्वस्थ

माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या मिरज तालुक्यातील समर्थक गटाला जयंत पाटलांनी सुरुंग लावला आहे. खासदार संजय पाटील यांच्याकडे हा गट काही प्रमाणात झुकला होता. मात्र, भाजपमध्ये न जाता ‘काका गट’ म्हणून ते काम करत होते. भाजपची राज्यातील सत्ता गेल्यानंतर हा गट राष्ट्रवादीकडे सरकला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या जत तालुक्यातील प्रभावाला धक्का देण्याचे जयंत पाटलांचे धोरण आहे. त्यामुळे एकीकडे विशाल पाटील अस्वस्थ आहेत, तर भाजप बेसावध आहे. गळती रोखण्याचा त्यांचा प्रयत्नही होताना दिसत नाही. जयंत पाटील त्याचा फायदा घेत आहेत.


जगताप वेट आणि वॉचच्या भूमिकेत, संजयकाकांचा कल राष्ट्रवादीकडे 

प्रकाश जमदाडे, बसवराज पाटील हे दोन महत्वाचे नेते जत तालुक्यात राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचले आहेत. दुसरीकडे पाटील यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासाठीही गळ टाकला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भविष्यात निवडणुकीसाठी आघाडी झाली, तर जगताप यांची अडचण होऊ शकते, त्यामुळे सध्या ते वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहेत. नवी आघाडी किंवा युती आकाराला आली तर जगताप राष्ट्रवादीबाबत विचार करू शकतात. जयंत पाटलांच्या राजकीय डावपेचावर त्यांचा विश्वास किती आहे, हे ही बघावे लागेल. सर्वांत म्हत्वाचे म्हणजे खासदार संजय पाटील सध्या भाजपमध्ये असले तरी त्यांनीही जयंतरावांच्या कलाने राजकारणाचे डाव टाकायला सुरुवात केलेली आहे. आगामी झेडपी, जिल्हा बँक, बाजार समिती निवडणुकांमध्ये ते जयंत पाटलांच्या साथीने चालतील, अशा सध्याच्या हालचाली आहेत. 

मोठे नेते असूनही वर्चस्वाचा प्रयत्न 

आर. आर. पाटील, पतंगराव कदम, आणि मदन पाटील असे तीन मोठे नेते असतानाही जयंत पाटील यांनी तेव्हाही सांगली जिल्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. तशी मोट त्यांनी बांधली होता. मात्र, ते प्रयत्न २०१४ च्या मोदी लाटेने उधळून लावले. या तीन प्रमुख नेत्यांच्या पश्‍चात आता जयंत पाटलांकडेच जिल्ह्याची सुत्रे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संस्थांवर वर्चस्व राखण्याचे त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com