योग्य सन्मान न मिळाल्यास आमचा मार्ग आम्हाला मोकळा : समरजितसिंह घाटगे गटाचा इशारा - If we don't get proper respect, our way will be clear for us : warning of Samjarjit Singh Ghatge group | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

योग्य सन्मान न मिळाल्यास आमचा मार्ग आम्हाला मोकळा : समरजितसिंह घाटगे गटाचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

सत्ताधारी गटाकडून कोणत्याही पद्धतीने या निवडणुकीत आमच्या गटाला विश्वासात घेण्यात आलेले नाही.

कागल (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत राजे गटाला कोणी गृहीत धरून चालत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील 100 हून अधिक ठरावधारकांनी यासाठी पक्का निर्धारच केला आहे. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आमची मते निश्चितच निर्यायक ठरु शकतात. योग्य सन्मान न झाल्यास आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे, अशा तीव्र भावना (स्व) राजे विक्रमसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ निवडणुकीसाठी झालेल्या मेळाव्यात व्यक्त केल्या.

कागल येथे राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील म्हणाले, ‘‘गोकुळ दूध संघ व राजे गट यांचे फार जुने नाते आहे. (स्व.) राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सातत्याने या संघाच्या प्रगतीपथावरील वाटचालीत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम झाले आहे.’’

मागील तीन निवडणुकीत राजे गटावर अन्याय झालेला आहे. राजे गटाचा प्रतिनिधी गोकुळ दूध संघामध्ये नसल्यामुळे आम्हाला मानणाऱ्या दूध संस्था आणि दूध उत्पादकांची बऱ्याच वेळा कुचंबणा होत असते. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राजे गट राजकारणात सक्रिय झालेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधात प्रबळ प्रतिस्पर्धी असूनही राजे गटाने आपले वेगळे अस्तित्व दाखवले आहे. विधानसभेच्या निवडणुकीला 90 हजारहून अधिक भरघोस मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवारांमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाची ही मते आहेत. 

जिल्ह्याच्या आर्थिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गोकुळमध्ये राजे गटास प्रतिनिधित्व मिळणे क्रमप्राप्त आहे. समरजितसिंह राजेंनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी गटाकडून कोणत्याही पद्धतीने या निवडणुकीत आमच्या गटाला विश्वासात घेण्यात आलेले नाही किंवा राजे गटास योग्य प्रतिनिधित्व देण्याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चाही करण्यात आलेली नाही. याचा अर्थ ते आम्हाला गृहीत धरत आहेत. असाच होतो. परंतु आम्हाला जर कोण गृहीत धरून योग्य सन्मान करणार नसेल, तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा राहील, असा इशारा गोकुळच्या सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला दिला आहे. 

या वेळी प्रा. सुनील मगदूम, संजय पाटील बेळवळेकर, सुनीलराजे सूर्यवंशी, 'बिद्री' चे संचालक दत्तामामा खराडे, 'शाहू'चे संचालक बॉबी माने, बाबगोंडा पाटील, प्रताप पाटील  धनंजय पाटील, युवराज पाटील आदींनी भावना व्यक्त केल्या. उत्तम पाटील यांनी आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख