पवार एके पवार म्हणणारा मी कार्यकर्ता : मुश्रीफांचा चंद्रकांतदादांवर पलटवार  - I am an activist who calls Pawar AK Pawar : Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

पवार एके पवार म्हणणारा मी कार्यकर्ता : मुश्रीफांचा चंद्रकांतदादांवर पलटवार 

निवास चौगले 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

मी शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय? मला काही फरक पडत नाही.

कोल्हापूर : "मला निष्ठा दाखवण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागते, असे वक्‍तव्य करण्यात आले. खरोखर अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका. कारण कितीही संकटे आली, मला भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन मंत्री केले, प्रचंड माया दिली, तरीही पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे,' असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. 

राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बोलण्याआधी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ वक्तव्य करतात. त्यांची ही कृती म्हणजे "आ बैल मुझे मार' आणि "निष्ठा दाखविण्याची त्यांची केविलवाणी धडपड असते,' असे विधान भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत आज (ता. 24 ऑगस्ट) प्रत्युत्तर दिले. 

हसन मुश्रीफ म्हणाले की, "मी शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय? मला काही फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते, त्या वेळी फक्त लोककल्याण व विकास ही दोनच ध्येय माझ्या डोळ्यासमोर असतात. त्यामुळे निष्ठा दाखविण्याची वेळ माझ्यावर येत नाही.' 

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना उद्देशून मी कोणतीही टीका केली नव्हती. पहिल्यांदा अर्सेनिक अल्बम खरेदीवरुन पाटील यांनी माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के जिल्हा परिषद आणि 10 टक्के पंचायत समितींना देण्याचा निर्णय मी घेतला. 

या निधीचे वाटप झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार केला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी "हा तर केंद्र सरकारचा निर्णय असून हसन मुश्रीफ हार कसे घालून घेत आहेत?' असे कुत्सिक विधान केले होते. वरील दोन्ही गोष्टीवरून मी त्यांना माफी मागण्याची विनंती केली होती. माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले होते. सर्वांचे पुरावे त्यांच्याकडे पाठवले होते. मात्र त्यांनी अद्यापही काही प्रतिसाद दिला नसल्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख