मी सर्वांचा बाप, पुरून उरणार : महादेवराव महाडिक गरजले - Former MLA Mahadevrao Mahadik gave a clear answer to the opponents who criticized the Gokul elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मी सर्वांचा बाप, पुरून उरणार : महादेवराव महाडिक गरजले

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

योग्य वेळी समक्ष चौकात उत्तर देईन.

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यावर बरीच टीका-टिपणी सुरू आहे. त्याचे उत्तर आज देण्याची मला गरज वाटत नाही. योग्य वेळी समक्ष चौकात उत्तर देईन. मी सर्वांचा बाप आहे. पुरून उरणार, अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा मेळावा झाला. या प्रसंगी महाडिक बोलत होते. माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी मंत्री भरमू पाटील, गोकुळचे संचालक रणजित पाटील, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधीनगरातील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये हा मेळावा झाला.

महाडिक म्हणाले, ‘‘लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पण, गोकुळ गोरगरिबांचा आहे. तो दूध उत्पादक-कर्मचाऱ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे. त्याला धक्का लागता कामा नये. आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. पण, तुमच्या कृपेने विजय आमचाच आहे. संघ योग्य हातात राहण्यासाठी एकही मत इकडे-तिकडे होता कामा नये.’’

घाटगे म्हणाले, ‘‘गोकुळचा प्रपंच गावागावात-वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या माणसाचा आहे. आतापर्यंत तो अत्यंत जबाबदारीने सांभाळला आहे. त्यामध्ये तण वाढू देऊ नका. त्याचा बंदोबस्त करुन पिकांचे रक्षण करा.’’ 

रणजित पाटील म्हणाले, ‘‘खासगी दूध संघ अनेक आले. पण, टिकले नाहीत. कारण, गोकुळ प्रत्येकाच्या संसारात पोचला आहे. त्याने सामान्य माणूस उभा केला आहे.’’

कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सत्ताधारी आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे  कुपेकर यांनी सांगितले.

धनंजय महाडिक, भरमू पाटील, उमेदवार प्रकाश चव्हाण, संजय बटकडली, माजी संचालक बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुभाष चोथे, मार्तंड जरळी यांचीही भाषणे या वेळी झाली. उमेदवार सदानंद हत्तरकी, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, बाबूराव मदकरी, किरण पाटील, रमेश आरबोळे, भैरू पाटील, कृष्णराव वाईंगडे, उदय देसाई, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.

 
होय, गोकुळमध्ये माझे ४० टॅंकर आहेत

महादेवराव महाडिक म्हणाले, ‘‘गोकुळमध्ये माझे 40 टॅंकर आहेत. पण, ते टेंडर पद्धतीने घेतले आहेत. इतरांशी स्पर्धा करुन टेंडर मिळविले आहे. मला विरोध करण्यासाठी काही जणांनी टेंडर भरले होते. पण, त्यांना वाहतूक करणाऱ्या गाड्याही मिळाल्या नाहीत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख