आमच्या तालुक्यात हस्तक्षेप करू नका; अन्यथा... : काँग्रेस कार्यकर्त्यांचा ज्येष्ठ नेत्याला दम

कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर माजी खासदार हुसेन दलवाई आणि निरीक्षक युवराज मोहिते यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.
Don't interfere in Chiplun Congress : Congress workers told the senior leader
Don't interfere in Chiplun Congress : Congress workers told the senior leader

चिपळूण : चिपळूण तालुका काँग्रेसमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याला चिपळूण काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी बैठकीतच सज्जड दम दिल्याप्रमाणे सुनावले. यापुढे चिपळूण काँग्रेसमध्ये हस्तक्षेप केल्यास तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी त्यांना दिल्याची जोरदार चर्चा आहे. (Don't interfere in Chiplun Congress : Congress workers told the senior leader)

चिपळूणमध्ये 22 जुलैला महापूर आल्यानंतर काँग्रेसचे मंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेते पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. नेत्यांच्या पाहणी दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांची बैठक होते आणि त्या बैठकीत पक्षाच्या नेत्याला कोणत्या भागात घेऊन जायचे, याचे नियोजन केले जात होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही चिपळूणचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्याची माहिती तालुका काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नव्हती. 

राऊत यांचा दौरा झाल्यानंतर माजी खासदार हुसेन दलवाई आणि पक्षाचे निरीक्षक युवराज मोहिते, आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत ऊर्जामंत्री राऊत यांच्या दौऱ्या‍संदर्भात चिपळूण तालुका काँग्रेसला विश्वासात घेण्यात आले नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची समजूत काढणे, हे त्या ज्येष्ठ नेत्याकडून अपेक्षित होते. त्या नेत्याने कार्यकर्त्यांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिथरलेल्या कार्यकर्त्यांनी त्या ज्येष्ठ नेत्यांचा अतिशय कडक शब्दांत समाचार घेतला.

तुमच्यामुळे ऊर्जामंत्री राऊत यांच्या दौऱ्याचे नियोजन फसले. पक्षाची बदनामी झाली. यापुढे असे करू नका, अशी सूचना केली. त्यानंतरही काँग्रेसचा हा ज्येष्ठ नेता आपला हेका सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे बिथरलेल्या कार्यकर्त्यांनी यापुढे चिपळूण काँग्रेसमध्ये लक्ष देऊ नका, असा इशारा दिला. जर यापुढे तुमचा हस्तक्षेप चिपळूण तालुका काँग्रेसमध्ये झाला, तर तालुक्यात फिरू देणार नाही, असेही त्या ज्येष्ठ नेत्याला सांगण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर माजी खासदार हुसेन दलवाई आणि निरीक्षक युवराज मोहिते यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

ऊर्जामंत्री राऊत यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांचे पाय जमिनीला लागले नाहीत. वीजमाफीच्या विषयावर पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय काढला. त्यामुळे पक्षाची हानी झाली. हा गंभीर प्रकार तसेच नितीन राऊत यांच्या दौऱ्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे येथील कार्यकर्ते संतप्त झाले होते.

मंत्र्याचा दौरा फसल्याने पक्षाचे हसे झाले  

चिपळूणमध्ये पक्षाचा कोणीही नेता किंवा मंत्री आला तर आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र बसून दौऱ्याचे नियोजन करतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतो. असे असताना आम्हाला विश्वासात न घेता मंत्र्यांचा दौरा आयोजित करण्यात आला, तोही यशस्वी झाला नाही. त्यात पक्षाचे हसे झाले. यापुढे असे होऊ नये, अशी मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे, असे युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com